किरकोळ वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण;

रत्नागिरी ः प्रतिनिधी
किरकोळ कारणातून तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवार 12 जुलै रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास जे.के .फाईल्स कंपनीसमोर रमाकांत शर्मा यांच्या साईटवर घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कय्युम मुबारक खान (26,रा.कोकणनगर,रत्नागिरी) आणि मारुफ फारुख खान (25,रा.कोकणनगर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिध्देश रमेश यादव (23,रा.शांतीनगर रसाळवाडी,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी सिध्देश यादव हा त्याचा मित्र इम्रान सय्यद याची लादी बसवण्याच्या कामासाठी मजूर आणण्यासाठी इम्रान सय्यद व राज घोरपडे या दोघांसह रमाकांत शर्मा यांच्या साईटवर नवे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी गेला.
तेथील बांधकामाच्या वरच्या मजल्यावर ते गेले असता त्यांना त्याठिकाणी मारुफ खान दिसून आला. त्याला फिर्यादीने तुझे इथे काय काम आहे असे विचारले. त्यावर त्याने माझे लादी बसवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर तो फिर्यादी आणि त्याच्या मित्रांकडे रागाने बघू लागला तेव्हा फिर्यादीने त्याला काय बघतोस असे विचारले असता त्याने त्यांना शिवीगाळ केला.
त्यामुळे फिर्यादी आणि त्याचे मित्र वरच्या मजल्यावरुन खाली येउन गाडीजवळ उभे राहिले होते. तेव्हा संशयित मारुफने फोन करुन कय्युम खानला त्याठिकाणी बोलावून घेतले. काही वेळोन कय्युम त्या ठिकाणी आला असता त्याने सोबत आणलेला लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात तीन वेळा मारुन दुखापत केली. त्याने पुन्हा फिर्यादीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या मित्रांनी त्याला थांबवून त्याच्या हातातील रॉड काढून घेतला. दरम्यान,साईटवरील काँट्रॅक्टर आदिनाथ कांबळे तिथे आले असता त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर फिर्यादीच्या मित्रांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.