गोव्यातून गेली होती चोरीस
महामार्ग पोलिसांचे कौतुक
कणकवली : येथील नाईक पेट्रोल पंपाच्या आवारात एप्रिल महिन्यापासून उभी करून ठेवलेली यामाहा स्कूटर अखेर तिच्या मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली. ही बाब पेट्रोल पंपावरील कर्मचारी अक्षय मेस्त्री यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. अक्षय मेस्त्री यांनी ही स्कूटर दीर्घकाळापासून पार्किंग अवस्थेत असल्याचे लक्षात येताच महामार्ग पोलीस केंद्र ओसरगाव, कणकवली येथील एएसआय प्रकाश गवस यांना याबाबत माहिती दिली.
प्रकाश गवस यांनी तात्काळ चौकशी करत संबंधित स्कूटर मालकाशी संपर्क साधला. चौकशीत ही स्कूटर चोरीस गेल्याची माहिती मिळाली. मात्र त्याबाबत कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नव्हती. मालकाने मात्र पणजी पोलीस ठाण्यात यासंदर्भात लेखी निवेदन दिले होते. एएसआय प्रकाश गवस यांनी तातडीने पणजी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक खात्री करून घेतली. त्यानंतर सदर स्कूटर अधिकृतरीत्या मालक ॲलेक्स घोन्सालवीज यांच्या ताब्यात देण्यात आली. या घटनेनंतर ॲलेक्स घोन्सालवीज यांनी महामार्ग पोलीस विभागाचे आभार मानले.
दरम्यान, महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र कसाल, ओसरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी सर्व अंमलदारांना चोरीस गेलेल्या वाहनांच्या शोधासाठी सातत्याने सूचना दिलेल्या आहेत. यामुळेच ही स्कूटर मूळ मालकापर्यंत पोहोचवणे शक्य झाले.











