मुंबई: मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे! गेटवे ऑफ इंडिया परिसरातील प्रस्तावित रेडिओ जेट्टीच्या कामाला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
हायकोर्टाचा हिरवा कंदील, अडथळे दूर!
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, गेटवे ऑफ इंडिया परिसरात बंदर विभाग आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून रेडिओ जेट्टीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, या कामासंदर्भात काही याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. आज सकाळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला तीन निरीक्षणे (observations) पाळण्यास सांगितले आहे, ज्यांचे आम्ही पूर्णपणे पालन करू, असे राणे म्हणाले.
मुंबईकरांना मोठा दिलासा: ४० मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट!
नितेश राणे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “मुंबईकरांसाठी, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही रेडिओ क्लब जेट्टी अत्यंत महत्त्वाची आहे.”
या जेट्टीमुळे मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होईल. आता जो नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधत आहोत, तिथे रेडिओ जेट्टीवरून केवळ ४० मिनिटांत पोहोचता येईल, अशा पद्धतीचा मार्ग तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे सहकार्य, वेगाने काम पूर्ण करणार!
या प्रकल्पासाठी वाहतूक कोंडी अहवाल (Traffic Congestion Report), हेरिटेज समितीचा अहवाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवानग्यांसह अन्य सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि स्थानिक आमदार व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेत मोठे सहकार्य केल्याचे राणे यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आता रेडिओ जेट्टीचे काम वेगाने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आणि या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाचे आभार मानले.












