वाढीव टप्प्या संदर्भात आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गौरव पोंक्षे l माखजन :      महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २०% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.९ जुलै रोजी आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत बैठक झाली.बैठकीत जुलै चा पगार ऑगस्ट मध्ये होत असताना तो वाढीव २०% ने होईल असा निर्णय देण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर या पगारासाठी लागणारी निधी ची तरतूद ही अधिवेशन काळात केली जाईल व १८ जुलै ला अधिवेशन संपल्यावर पुढील कार्यवाही होऊन ऑगस्ट महिन्यात लाभार्थ्यांना वाढीव २०% ने पगार होईल.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले होते.या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री गिरीश महाजन यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

९ जुलै रोजी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची कालमर्यादेत पूर्ती व्हावी यासाठी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

भेटी दरम्यान ९ जुलै रोजी ठरल्याप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे.१८ रोजी निधीसह अनुदानाचा निर्णय घोषित करू असे संगितले.यावेळी मंत्री गिरीश महाजन ,पदवीधर आमदार सतीश चव्हाण,कृती समितीचे खंडेराव जगदाळे,संजय डावरे,पुंडलिक काका रहाटे उपस्थित होते.