राजापूर अर्बन बँकेतील ठेवी सुरक्षित, अफवांवर विश्वास ठेवू नये

संजय ओगले व शेखरकुमार अहिरे यांचे बँकेच्या सभासद, ठेवीदारांना आवाहन

राजापूर (वार्ताहर): रिझर्व्ह बँकेने बंधनकारक केल्याप्रमाणे राजापूर अर्बन बँकेने डिपॉझिट इंन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन यांची सहामाही वर्गणी भरलेली आहे. त्यानुसार बँकेच्या ठेवी सुरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या सभासद व ठेवीदार यांनी कुठल्याही अपप्रचाराला किंवा अफवांवर विश्वास न ठेवता सत्यस्थिती बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून जाणून घ्यावी असे आवाहन राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.

येथिल राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि., राजापूर या बँकेबाबत लोकांमध्ये अफवा पसरविल्या जात आहेत. त्याबाबत अध्यक्ष संजय ओगले व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार उत्तम अहिरे यांनी याबाबत एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे.

या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी रत्नागिरी शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे हे वृत्त खोडसाळ असून १०४ वर्षाच्या बँकेला बदनाम करण्यासाठी असा अप्रचार केला जात आहे. खरी परिस्थिती रत्नागिरी शाखेत तत्कालीन शाखाधिकारी संतोष शरद नारकर यांनी नियमबाह्य व स्वतःच्या अधिकारात रु.२ कोटी ७९ लाख कर्ज वाटप केले होते आणि या गैर प्रकाराबाबतची कबुली स्वतः श्री. नारकर यांनी दि.०३/०३/२०२५ च्या लेखी पत्रान्वये दिलेली आहे. सदरच्या कर्जापैकी रु.७२ लाख वसूल करण्यात आलेले असून अजून रु.२ कोटी ७ लाख येणे आहे. याबाबत बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी संतोष नारकर यांचे विरुध्द अंतर्गत चौकशी समिती नेमून त्यांना दि. ०७/०४/२०२५ रोजी बँकेतून निलंबीत करण्यात आलेले आहे. सदर संशयीत कर्ज खात्यांबाबत रिझर्व्ह बँकेला दि. २५/०६/२०२५ रोजी कळविण्यात आलेले आहे. तसेच तत्कालीन शाखाधिकारी श्री. नारकर व संशयीत कर्जदार यांचे विरुध्द कारवाई करण्याकरीता राजापूर पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.

त्याच प्रमाणे सदर कर्जदारांविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व ९१, तसेच सरफेसी अॅक्ट २००२ या द्वारे दावे दाखल करण्यात आलेले आहेत. सदरच्या दाव्यांपैकी २ कर्जदारांवर कारवाई होऊन रोख रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. याच प्रमाणे विद्यमान संचालक मंडळाने नियोजन करून पुढील तिमाही कालावधीमध्ये सदर प्रकरणांची वसुली प्रभावीपणे होईल याबाबत कृती आराखडा तयार केला असल्याचे नमुद केले आहे. तर दाखल केलेल्या दाव्यांप्रमाणे २ जामिनदारांना अटक वॉरंट काढण्यात आलेला असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला किंवा अफवांवर विश्वास न ठेवता सत्यस्थिती बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून जाणून घ्यावी असे आवाहन श्री. ओगले व श्री.अहिरे यांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.