राजापूर | प्रतिनिधी : रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी पहाटे राजापूर येथे गोवा राज्यातून आणलेल्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त केला. अंदाजे २२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा मुद्देमाल असून, या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा राज्यातून मुंबईकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजापूर बसस्थानकासमोर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सापळा रचला. पथकाने संशयास्पद हुंडाई क्रेटा ( क्र. MH 07 AS 3458) या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची एकूण ७७ बॉक्स दारू (६६५.८ बल्क लिटर) आढळून आली.
या कारवाईत दारूसह वाहन असा एकूण २२,१९,७६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या दारूची किंमत ७,१९,७६०/- रुपये इतकी आहे. या प्रकरणी वाहनचालक बस्त्याव सायमन घोन्सालविस (रा. होडावडा, ख्रिश्चनवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) आणि ९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई; प्रसाद सुर्वे, संचालक (अंमलबजावणी व दक्षता); विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात निरीक्षक अमित पाडळकर यांच्यासोबत दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, जवान वैभव सोनावळे, वाहनचालक मलिक धोत्रे, तसेच मानस पवार, सागर टिकार, निलेश तुपे आणि विशाल भोसले यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत













