रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी पुन्हा एकदा गॅस टँकरचे थैमान पाहायला मिळाले. हातखंबा येथे एक टँकर रस्ता सोडून सरळ चहाच्या टपरीत जाऊन घुसला, तर दुसरा टँकर निवळी येथे पलटी झाला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली असली, तरी अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये.
याआधीही –
आठवडाभरापूर्वी हातखंबा पुलावरून गॅस टँकर कोसळून भीषण अपघात झाला होता, ज्यात वायुगळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
दीड महिन्यांपूर्वी निवळी येथे एलपीजी टँकरच्या अपघातानंतर घरांना आग लागली होती, आणि अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले होते.
या महिन्या-दीड महिन्याच्या कालावधीत एकूण चार गॅस टँकर अपघात झाल्यामुळे हातखंबा व निवळी परिसरातील ग्रामस्थ सततच्या धोक्यात आहेत.
“या मार्गावर गॅस टँकरवर कुणाचं नियंत्रण आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत. शाळा, घरे, चहा टपऱ्या यांच्याजवळ होत असलेल्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ग्रामस्थांनी हातखांबा येथे अपघातग्रस्त ठिकाणी ठिय्या आंदोलन व रास्ता रोको सुरू केला असून, प्रशासनाकडून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.












