राजापूर (वार्ताहर): येथिल राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या तसेच भागवताचार्य ह. भ. प. सौ. अनिता अनिल ठाकुर देसाई (६९) यांचे बुधवार दि. १६ जुलै रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी ३ वाजता शहरातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शहरातील ओगलेवाडी येथिल रहिवासी असलेल्या सौ. अनिता ठाकुरदेसाई यांनी काही काळ राजापूर नगर परिषद नगरसेविका म्हणून काम केले आहे. सामाजिक, सहकार क्षेत्रात त्या सक्रीय होत्या. त्यांनी राजापूर अर्बन बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा उमटविला. काही काळ त्यांनी शहरात हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. अत्यंत मृदुभाषी, मनमिळावू स्वभाव यांमुळे त्यांचे अनेकांशी जिव्हाळयाचे संबंध जोडले.
काही वर्षांपुर्वी त्यांना दुर्धर असा आजार जडला होता. मात्र अध्यात्मिक बळावर त्यांनी त्यावर मात केली. तर त्यापुढील जीवन त्यांनी अधात्मिक साधनेत घालविले. भागवताचार्य, किर्तनविशारद ही पदवीही त्यांनी संपादन केली. त्या किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
राजापूर अर्बन बँकेचे सुकाणु समितीचे अध्यक्ष अनिल ठाकुरदेसाई यांच्या त्या पत्नी होत तर सुवर्णकार व राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदिप मालपेकर यांच्या त्या सासुबाई होत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे.











