दापोलीत उनाड कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ल्याचा प्रयत्न

ज्येष्ठ पत्रकार सलीम रखांगे यांच्या जागृतीमुळे टळला अनर्थ

दापोली । प्रतिनिधी – दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात उनाड कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम रखांगे यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

ही घटना उसी रेसिडेन्सी इमारतीसमोर घडली. काही उनाड कुत्र्यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका लहान मुलावर अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तो मुलगा घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता. याच वेळी सलीम रखांगे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पुढे जाऊन त्या मुलाला कुत्र्यांपासून दूर केले आणि सुरक्षित स्थळी नेले.
रखांगे यांच्या तत्परतेमुळे त्या लहान मुलाचा जीव वाचला आणि मोठा अपघात टळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवासी आणि पालक वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
उशी रेसिडेन्सीमधील नागरिक तसेच पालक वर्गाने दापोली नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उनाड कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.
दापोली नगरपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली आहे. यासाठी कुत्रे पकडण्याचे मोहिमेचे आयोजन, निर्जंतुकीकरण तसेच पुनर्वसनासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.