कणकवली पटवर्धन चौकाने घेतला मोकळा श्वास.!

कणकवली : शहरातील पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखाली नेहमीच पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे बहुतेकदा नाहक वाहतूक कोंडी होत असते. यावर नामी उपाय काढत वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी पटवर्धन चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर दुतर्फा बॅरेकेट्स लावून पटवर्धन चौक अगदी व्हेईकललेस केला आहे. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी पटवर्धन चौकात फ्लायओव्हर खालील रस्त्यावर लावण्यात येणारी सर्व वाहने बुधवारी दिवसभरात हटवली.वाहनमालकांना पुन्हा त्या जागेत पार्किंग केल्यास दंड भरावा लागेल याची सक्त ताकीदही दिली. त्यानंतर चौकात दुतर्फा बॅरॅकेट्स लावून टू व्हीलर अथवा फोर व्हीलर वाहन पुन्हा पार्किंग होणार नाही याचीही खबरदारी घेतली. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी आलेले वाहनचालक पटवर्धन चौंकात आपली गाडी उभी करून खरेदीला जातात. त्यामुळे एक दोन म्हणता म्हणता पार्किंग केलेल्या 40 ते 50 गाड्यानी पटवर्धन चौक भरून जातो.साहजिकच याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो.याबाबत काही महिन्यांपूर्वी स्वतः आमदार नितेश राणे यांनी पटवर्धन चौकात आपल्या गाडीतून उतरत पार्किंग केलेल्या गाड्यांबाबत नाराजी व्यक्त करून पटवर्धन चौक मोकळा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर काही दिवस याची अंमलबजावणीही झाली.नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे पटवर्धन चौकात गाड्यांचे पार्किंग नित्याचेच झाले होते. बुधवारी 20 जून रोजी वाहतूक पोलीस हवालदार विनोद जाधव यांनी पटवर्धन चौक क्लिनअप मोहीम राबवली आणि चौक व्हेईकललेस केला. वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्या या कामगिरीचे स्थानिक नागरिकांतून कौतुक होत आहे