पेडणेत मंगळसूत्र चोरी प्रकरणी आयआरबी पोलीस कॉस्टेबलला अटक

पेडणे (प्रतिनिधी) :

तोरसे येथील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या आयआरबी (IRB) दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबल नीकेश च्यारी (रा. कोरेगाव) याला मोपा पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवार १७ रोजी सकाळी तोरसे येथे घडली.

मोपा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तोरसे येथे वासंती रामा शेट्ये ही महिला रस्त्याने जात होती. यावेळी संशयित निकेश च्यारी याने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकल वरून पळ काढला. याच दरम्यान महिलेने आरडाओरड केल्यानंतर बाजूलाच असलेले दोन युवक महिलेच्या मदतीला धावले. त्यांनी आपल्या गाडीने संशयिताचा पाठलाग केला.

पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच संशयित निकेश याने थेट तांबोसा भागात जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, पुढे रस्ता नसल्याने त्याने गाडी तिथेच टाकून जंगलात पळाला. दरम्यान, दोन्ही युवकानी मोपा पोलिसांना घटनेची माहिती दिली. मोपा पोलिसांनी संशयिताचा शोध घेत त्याला जंगलातून ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा नोंद केला.

संशयित निकेशने यापूर्वीही असे काही कारनामे केलेले आहेत. गेल्या वर्षी कोरगाव येथून एका लहान मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल निकेश च्यारी हा यापूर्वी निलंबित झाला आहे. मोपा पोलिसांनी संशयित निकेश च्यारी याच्यावर गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक नारायण चीमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.