कोंढेतड पुल, कोदवलीतील नवीन धरण आणि आता मुख्य रस्ता ठरणार निवडणूकीच्या प्रचाराचा मुद्दा
राजापूर | नरेंद्र मोहिते :
तब्बल साडेतीन वर्षाच्या प्रशासकिय राजवटीनंतर निवडणूक विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणूका होण्याची शक्यता असून त्याची प्रशासकिय प्रक्रिया सुरू झाली आहे. राजापुरातही नगर परिषद निवडणूकीचे पडघम वाजू लागले असून तब्बल साडेतीन वर्षानंतर होणाऱ्या या निवडणूकीसाठी सर्वच राजकिय पक्षांतील इच्छुकांच्या आशा आकांशाना चांगलेच धुमारे फुटू लागले आहेत. तर आता या निवडणूका डोळयासमोर असल्याने शहरातील विकास कामांच्या श्रेय वादाच्या लढायाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता निवणूकांची रणधुमाळी सुरू झाल्याची चाहुलही लागली आहे.
यापुर्वीं म्हणजे सन २००६ सन २०११ व सन २०१६ या कालावधीत झालेल्या नगर परिषदेच्या पंचवर्षीक निवडणूकीत कोंढेतड पुल, त्यानंतर कोदवली येथील नवीन पर्यायी धरण हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला होता. यारून त्या त्या निवडणूकीत चांगलाच धुरळा उडाला होता. अखेर रडत कढत साडेचार कोटीचा कोंढेतड पुल पुर्णत्वाला गेला मात्र त्याचा उपयोग केवळ छोटया वाहनांसाठी होत असल्याने त्याची मर्यादाही स्पष्ट झाली आहे. तर कोदवली येथील नवीन पर्यायी धरणाच्या माध्यमातुन राजापुर शहर वासीयांना २४ तास पाणी मिळणार हे आश्वासन अद्यापही सत्यात उतरलेले नाही, कारण धरणाचे काम आजही सुरू आहे. त्यामुळे या निवडणूकीत पुन्हा एकदा या धरणाचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
आता नव्याने चर्चेत आलेला आणि श्रेयवादात अडकलेला मुद्दा म्हणजे शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक हा मुख्य रस्ता होय. राजापूर शहरातील हा एकमेव असा मुख्य रस्ता चांगला करण्यात आणि चांगला ठेवण्यात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी नगर परिषदेवर सत्ता गाजवली त्यांना यश आलेले नाही. हा मुख्य रस्ताच नाही तर शहरातील अशा अनेक रस्त्यांची अशाच प्रकारे दुरावस्था झाल्याचे चित्र राजापूर शहरात पहावयास मिळते. अनेक प्रभागांतील रस्त्यांवरचे खड्डे पाहिल्यावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ता आहे असा प्रश्न पडतो. याचा नाहक मनस्ताप त्या भागातील नागरिक, पादचारी व वाहन चालकांना भोगावा लागतो.
दरवर्षी शासनाच्या वैशैष्टय पुर्ण, नगरोत्थान, रस्ता दुरूस्ती यांसारख्या विविध योजनांखाली कोटयावधीचे अनुदान शहराच्या विकासासाठी खास करून रस्त्यांसाठी येते. यातुन रस्तेही केले जातात, पण जेमतेम वर्षभर हा रस्ता टिकला तर नवल. मग पुन्हा खड्डे भरणे, पुन्हा नव्याने रस्ता डांबरीकरण करणे ही साखळी सुरू होते. यातुन नक्की कल्याण कोणाचे होते नागरिकांचे ठेकेदाराचे की लोकप्रतिनिधींचे असा जनतेचा सवाल आहे.
शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक हा मुख्य रस्त्यावरून सध्या राजापुरात राजकारण चांगलेच तापले आहे. दोन वर्षापुर्वीं झालेल्या या रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तर याच रस्त्यावर चौगुले मेडिकल ते पुढे हनुमान गल्ली पर्यंत मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत. याचा नागरिक, पादचारी व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून आमदार किरण सामंत यांनी या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून हे खड्डे बुजवावेत व भविष्यात या संपुर्ण तालीम खाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या सुधारणेबाबत आराखडा तयार करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. प्रशासनाकडून या खड्डेमय भागात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले व पुर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान अशा प्रकारे या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यास माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे यांनी विरोध केला होता. यावर शिवसेना व भाजपाकडून तीव्र आक्षेप घेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. श्रेयवादाची लढाईही सुरू झाली. यावरून नगर परिषद निवडणूक जवळ आल्याची कल्पना नागरिकांना आली. त्यामुळे आता या निवडणूकीत या मुख्य रस्त्यासह शहरातील अन्य रस्त्यांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला तर आश्चर्य वाटायला नको एवढं मात्र नक्की.
निवडणूका आल्या की राजापूरकरांना दरवेळी पोकळ आश्वासने दिली जातात. राजापूरकरही त्याला बळी पडतात. पण सत्तेवर बसल्यावर विकासाचे काय झाले हे विचारले जात नाही. राजापूरच्या मागून उदययास आलेली लांजा नगर पंचायत, देवरूख नगर पंचायत विकासाकडे झेपावत असताना राजापूरकरांच्या पदरी मात्र कायमच निराशा आलेली आहे. खड्डेमय रस्ते, गढूळ पाणी, उन्हाळयात पाणीटंचाई, गटारांची वाणवा, सांडपाण्याचा योग्य निचरा नाही आणि वर्षानुवर्षे डोक्यावर मारलेली पुररेषा अशा एक नाही अनेक समस्यांच्या गर्तेत राजापूर शहर अकडलेले आहे. यातुन सुटका कधी होणार असा नागरिकांचा सवाल आहे.
भविष्यात राजापूर शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या डोक्यावर लादलेली आणि शहराच्या विकासात मोठा अडसर ठरलेली पुररेषा उठविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, मुख्य रस्त्यासह सगळे रस्ते अद्ययावत असे झाले पाहिजेत, राजापूरकरांना शुध्द पाणी मिळाले पाहिजे, सांडपाण्याचा योग्य निचरा झाला पाहीजे, भूमीगत विजवाहिन्या झाल्या पाहिजेत अशा एक नाहीत अनेक मागण्या नागरिकांच्या आहेत. मात्र रस्ते, पाखाडया आणि मतांच्या राजकारणासाठी खासगी संरक्षण भिंती बांधून देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जरा दुरदृष्टी ठेऊन शहराच्या विकासासाठी काम केले पाहिजे. तर जनतेनेही यासाठी अधिक जागरूक होऊन शहराच्या विकासाला योग्य दिशा कोण देऊ शकेल याचा विचार करून भविष्यात निर्णय घेतला पाहिजे. मात्र सध्या तरी निवडणूकांचे पडघम वाजताच राजापुरात श्रेयवादाच्या लढाईचा धुरळा उडत आहे.
फोटो राजापूर नगर परिषद









