रोटरी स्कूलमध्ये जेष्ठ इतिहास अभ्यासक सुधीर श्रीरंग थोरात यांचे शिवचरित्रपर व्याख्यान संपन्न.

खेड – ( प्रतिनिधी )
गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये जेष्ठ इतिहास अभ्यासक सुधीर श्रीरंग थोरात व इतिहास संशोधक रुपेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र इतिहासाबद्दल मार्गदर्शन केेले.
या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात प्रमुख पाहुणे जेष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक, लेखक, श्रीशिवशंभो विचारमंच-महाराष्ट्र समन्वयक तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सहकार्यवाह व उत्तम वक्ते मा. श्री. सुधीर श्रीरंग थोरात, इतिहास संशोधक रुपेश मोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मंदार संसारे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रो. जोगेश साडविलकर, रो. विश्वास सोमण, रो. उमेश संसारे, डाॅ. परेश मळणगावकर, डाॅ. अमित चिखले, अनुलोम सामाजिक संस्थेचे कोकण प्रचारक श्री. राहुल ढेबे, शिवशंभो विचारमंच अभ्यासक डाॅ. सिध्देश चिखले, श्री. राहुल तुगावकर, श्री. गणेश सानप, ॲड. अमेय मालशे, श्री. प्रशांत वैद्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तद्नंतर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मंदार संसारे यांनी प्रमुख मान्यवर मा. श्री. सुधीर थोरात व मा. श्री. रुपेश मोरे यांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले. जेष्ठ इतिहास अभ्यासक मा. श्री. सुधीर श्रीरंग थोरात यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून शिवचरित्र का अभ्यासावे ? जगात सर्वाधिक जयजयकार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ, जन्मानंतरचा काळ व मृत्यूनंतरचा काळ याविषयी महत्त्वाच्या घडामोडी उलगडा करून सांगितल्या. शिवचरित्राची माहिती सांगताना त्यांनी स्वराज्याचे स्वप्न जे शहाजीराजे यांनी पाहिले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले.शहाजीराजे व जिजाऊंचे योग्य सुसंस्कार म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आहेत. त्यांच्या पराक्र‌माला आज तोडच नाही. त्यांनी कष्टाने उभारलेल्या व शौर्याने मिळविलेल्या किल्ल्यांचे संवर्धन व जोपासना करणे आपले कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेवरील आपले प्रेम दाखविले होते. अनेक मंदिरांची त्यांनी पुनर्निर्मिती केली. तसेच प्रशासनाची उत्तम व्यवस्था केली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यामध्ये निर्माण झालेली मोठी पोकळी छत्रपती संभाजी महाराजांनी भरून काढली. अशा या महान राजाचे चरित्र अभ्यासणे काळाची गरज बनली असल्याचे ते म्हणाले. शिवचरित्रपर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इतिहास अभ्यासक मा. श्री. रुपेश मोरे यांनी प्रथमतः ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‘ अशी शिवगर्जना केली. शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला, हे आपले भाग्यच आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली. आपल्या भारत देशाचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणली पाहिजे. त्यांचा आदर्श डोळयांसमोर ठेऊन आपण आपल्या यशाकडे वाटचाल केली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी शिवचरित्र स्पर्धेची माहिती व स्वरूप सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते शेवटी प्रमुख मान्यवरांना रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष रो. मंदार संसारे यांनी आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानले