शहानवाज शाह यांचे उपोषण तूर्त स्थगित
चिपळूण (प्रतिनिधी) : गुहागर-विजापूर महामार्गांवर संबंधित कंपनीने झाडे लावावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शहा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार होते परंतु ३१ जुलैपर्यंत झाडे लावण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले आहे. परंतु जर लागवड झाली नाही तर पुन्हा उपोषण करण्यात येईल, असा इशारा शहानवाज शहा यांनी दिला आहे.
गुहागर ते घाट माथा हे अंतर ७४.६०० कि. मी. आहे. गुहागर ते रामपूर २६.२३० कि.मी., साखरवाडी ते उक्ताड ६५० मी. व बहादूरशेख ते पिंपळी १३.६०० कि.मी. इतका मार्गाचे काम झाले आहे. रामपूर ते साखरवाडी १३.७७० मी याची तरतूद झाली आहे. पिंपळी ते घाट माथा २१.०० किमी आता हस्तांतरीत झाला आहे. आता ३४.३० किमी रस्ता झाला आहे, पैकी शहर व रहदारी भाग वगळता २७ किमी वर वृक्ष लागवड करणे शक्य आहे. प्रति किमी एका रांगेत एका बाजूला ३३० म्हणजे दोन्ही बाजू धरून १७८०० वृक्षाची लागवड होणे गरजेचे आहे, पैकी दहा हजार वृक्षाची लागवड गेल्या वर्षी केली होती असे ठेकेदारचे म्हणणे आहे. पैकी बहुतांशी झाडे मृत आहेत. सदरहू वृक्ष लागवड ही ३१ जुलै पर्यंत पूर्ण करणार अशी ग्वाही दिली. सदरहू झाडे आयआरसी नुसार ही लागवड झाली नाही व देखभाल केली गेली नाही तर ठेकेदारावर कारवाई करणार, अशी ग्वाही दिली. त्यामुळे उपोषण काही काळापुरते स्थागित केले असून काम न झाल्यास कोणतीही नोटीस न देता उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शहानवाज शहा यांनी दिला आहे.













