देवगड तालुक्यातील दहिबाव-वाघबीळ या वाडीला, कुठल्याही दळणवळणाच्या साधनांशिवाय राहावे लागत होते. मात्र, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी तातडीची गरज ओळखून त्या वाडीला रस्ता करून दिला आहे. त्यामुळे तेथील वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींना पावसात दहिबाव गावात येणे शक्य झाले आहे.

ना. नितेश राणे यांनी या रस्त्यासाठी तातडीने हालचाल केली व दहिबाव-वाघबीळसाठी कच्चा रस्ता तयार केला आहे.
दहिबाव-वाघबीळ येथील सुमारे २५ घरांच्या वस्तीला आजवर कोणताही रस्ता नव्हता. येथील लोकांना डोंगर चढून-उतरूनच रेशन, बाजारहाट तसेच आरोग्य सेवेसाठी जावे लागत होते. अखेर या वाडीतील रहिवाशांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा व्हॉट्सॲप नंबर मिळवून, त्यावर आपली अडचण मांडली आणि रस्त्याची मागणी केली व तेथील ग्रामस्थ तृप्ती झोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी थेट मंत्री ना. राणे यांची भेट घेतली. ना. नितेश राणे यांनी शासकीय निधी अथवा मंजुरीची वाट न पाहता, ओमटेक असोसिएट, देवगड यांना तात्पुरत्या स्वरूपात कच्चा रस्ता करून देण्याचे आदेश दिले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत हा रस्ता पुन्हा कोसळला. याची माहिती मिळताच, मंत्री ना. नितेश राणे यांनी पुन्हा रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. सध्या हा रस्ता व्यवस्थित सुरू असून आता त्यावरून वाहने ये-जा करू शकतील.
ग्रामस्थांनी मंत्री ना. नितेश राणे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. केवळ व्हॉट्सॲपवर समस्या कळविल्यावर त्यांनी तातडीने दखल घेतली आणि कोणत्याही शासकीय सोपस्कारांची वाट न पाहता रस्ता उपलब्ध करून दिला.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्त्याची वाट पाहणाऱ्या वाघबीळ-दहिबाव येथील ग्रामस्थांना अखेर पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे रस्ता मिळाला आहे. ग्रामस्थानी ओमटेक असोसिएट्स यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व आभार मानले.













