चिवला बीचच्या निळ्याशार समुद्रात डॉल्फिनचा मुक्त संचार ; चेतन खोत यांनी ड्रोन कॅमेऱ्यात कैद केले विलोभनीय दृश्य
समुद्र सफरीदरम्यान पर्यटकांना लाभला अनोखा अनुभव
अमित खोत | मालवण : मालवणच्या निसर्गरम्य चिवला बीच परिसरात समुद्र सफरीदरम्यान डॉल्फिनच्या थव्याचे मनोहारी दर्शन घडल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. अथांग निळ्याशार समुद्रात मुक्तपणे विहार करणाऱ्या डॉल्फिनच्या आकर्षक हालचालींनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे डॉल्फिनच्या या विलोभनीय जलक्रीडेचे मनमोहक दृश्य चेतन खोत यांनी ड्रोन कॅमेऱ्यात कैद केले. समुद्राच्या निळ्याशार पाण्यात डॉल्फिनचा मुक्त संचार आणि त्यांच्या लयबद्ध हालचालींचे टिपलेले हे दृश्य मालवणच्या समृद्ध सागरी जैवविविधतेची अनुभूती देणारे ठरले आहे.
मालवणच्या चिवला बीच परिसरात पर्यटन व्यावसायिक विशाल गोवेकर, चेतक पराडकर, तुळशीदास गोवेकर आणि रुपेश वराडकर यांच्या बोटीतून पर्यटकांची समुद्रसफर सुरू होती. याचदरम्यान समुद्रात डॉल्फिनचा थवा नजरेस पडला. समुद्राच्या लाटांवर उसळी घेत मुक्तपणे विहार करणाऱ्या डॉल्फिनच्या हालचाली पाहून पर्यटक सुखावले. समुद्रसफरीचा आनंद घेत असतानाच अचानक घडलेल्या या दर्शनामुळे पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव मिळाला.
यावेळी चेतन खोत यांनी ड्रोनच्या साहाय्याने समुद्रातील डॉल्फिनच्या हालचालींचे चित्रीकरण केले. समुद्राच्या निळ्याशार पाण्यात एकत्रितपणे संचार करणाऱ्या डॉल्फिनचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आले. या चित्रीकरणातून मालवणच्या सागरी निसर्गसौंदर्याचे आणखी एक आकर्षक रूप समोर आले आहे.
मालवणचा समुद्रकिनारा, स्वच्छ निळेशार पाणी, समृद्ध सागरी जैवविविधता आणि विविध जलपर्यटन उपक्रमांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्यातच चिवला बीच परिसरात घडलेल्या डॉल्फिन दर्शनामुळे समुद्रसफरीच्या आनंदात आणखी भर पडली आहे. अशा नैसर्गिक अनुभवांमुळे मालवणच्या सागरी पर्यटनाचे आकर्षण अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.












