सन्मा. आ. नितेशजी राणे वाढदिवस विशेष
मुंबई : डॉ. सुकृत खांडेकर : गेल्या एक-दीड महिन्यांपासून भाजपचे तेजतर्रार युवानेते आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडुप आणि पश्चिम उपनगरातील वांद्र्यातील मातोश्रीकडून भाजपवर असंबद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी उबाठा सेनेकडून वाट्टेल ते आरोप केले जात आहेत. शिंदे समर्थक आमदारांवर गद्दार आणि खोकी असा जप तर अहोरात्र चालू आहे. उबाठाच्या बकवास पत्रकार परिषदांना चॅनेलवाले का एवढे महत्त्व देत आहेत हे त्यांनाच ठाऊक…. पण तेच तेच आरोप व थुकरट भाषा ऐकून लोकही वैतागले आहेत. मग या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? उबाठा सेनेच्या बेताल प्रवक्त्यांना लगाम कोण घालणार? शेरास सव्वाशेर कोण भेटणार? भाजपवर होणाऱ्या बेदरकार आरोपांना तेवढ्याच ताकदीने रोज कोण उत्तर देणार? उबाठा सेनेच्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी पक्षाने नितेश राणेंवर सोपवली आणि रोज ‘सामना विरुद्ध प्रहार’ अशी जुगलबंदी सुरू झाली. नितेश राणे यांनी आपल्या अचूक नेमबाजीने उबाठा सेनेची धारच बोथट करून टाकली.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांना रोजच्या रोज उत्तर देऊन त्यांच्या आरोपातील हवाच काढून घेण्याचा सपाटा चालवला आहे. नितेश राणे म्हणजे उबाठा सेनेची पिसे काढणारा भाजपचा युवा नेता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. भाजपवर किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ला झाला की दुप्पट वेगाने प्रतिहल्ला हे त्यांच्या कार्यपद्धतीचे सूत्र आहे. नितेश राणे हे उबाठा सेनेला दिवसेंदिवस भारी पडत आहेत. एक घाव दोन तुकडे नव्हे, तर एक घाव अनेक तुकडे करण्याचे कसब नितेश राणे यांच्याकडे आहे. उबाठा सेनेच्या मर्मावर अचूक घाव घालण्याचे काम नितेश राणे करीत असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची जाहीरपणे प्रशंसा केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी पक्षाच्या चाळीस आमदारांसह पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला, तेव्हापासून उबाठाच्या रडारवर ते नंबर १चे राजकीय शत्रू आहेत. ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे दहा अपक्षही आमदार ठाकरेंना सोडून गेले ही आणखी मोठी चपराक होती. गेल्या वर्षभरात सतत कोण ना कोण उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. उबाठा सेनेच्या विधान परिषदेतील आमदार मनीषा कायंदे आणि उपनेते माजी आमदार शिशिर शिंदे यांनी याच आठवड्यात मातोश्रीला जय महाराष्ट्र करताच उबाठा सेनेच्या नेतृत्वाचा रक्तदाब वाढणे स्वाभाविक आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणे आणि त्यांना आव्हान देणे ही त्यांची सवय अजून संपत नाही. ‘देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला जाण्याऐवजी मणिपूरला जावे’, असा सल्ला देणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नितेश राणे यांनी ‘ओसाड गावचे पाटील’ असे संबोधले तेव्हा सोशल मीडियावर नितेश यांची प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रियांचा जोरदार वर्षाव झाला. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत उद्धव ठाकरे केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले होते. आता तेच ‘पंतप्रधानांनी अमेरिकेला
न जाता मणिपूरला जायला हवे’ असा सल्ला देत आहेत, याची सोशल मीडियावर यथेच्छ टिंगल उडवली गेली.
एका सर्व्हेमध्ये शिवसेना-भाजप युती ही महाराष्ट्रातील जनतेला अधिक पसंत आहे, असे आढळून आले. त्याच सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकप्रिय आहेत, असेही आढळून आले. राष्ट्रीय व राज्य पातळीवर असे सर्व्हे होतच असतात. सर्व्हेची जाहिरात पाहून उबाठा सेनेचे पोट का दुखावे? हे समजत नाही. एकनाथ शिंदे यांना लोकप्रिय ठरविणारा सर्व्हे हा काय त्यांच्या बंगल्यात तयार केला काय, असा प्रश्न उबाठाने विचारून शिंदे यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात पहिल्या पाच क्रमांकात लोकप्रिय मुख्यमंत्री असे सर्व्हे आले होते व त्याचा फार मोठा गवगवा स्वत: ठाकरेंनी केला होता. संजय राऊत यांनी ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा वारंवार उल्लेख केला होता. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री असा प्रचार तेव्हा भरपूर केला गेला. त्याची आठवण करून देत नितेश राणे यांनी विचारले, “ठाकरे यांना लोकप्रिय मुख्यमंत्री ठरविणारा सर्व्हे हा कर्जतच्या फार्म हाऊसवर तयार केला गेला होता काय?”
ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कोविडमुळे राज्यात दीड लाखांवर लोकांचे मृत्यू झाले, हजारो उद्योग बंद पडले. लाखो कर्मचारी-कामगार रस्त्यावर आले, हजारो संसार उद्ध्वस्त झाले, मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशात बेस्ट सीएम कसा ठरला? असे प्रश्न केवळ नितेश राणेच आपल्या ‘राणे स्टाईल’मध्ये विचारू शकतात.
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली. ही घटना थरारक असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले. राऊत बंधूंविषयी सहानुभूती निर्माण व्हावी अशी त्याला प्रसिद्धी मिळाली. प्रत्यक्षात धमकी देणारा हा त्यांचाच जवळचा कार्यकर्ता होता, हे नितेश राणे यांनी उघडकीस आणले व त्याचे पुरावे म्हणून फोटोही दाखवले. स्वत:च्या कार्यकर्त्यांकडून धमकी घ्यायची व पोलीस संरक्षण वाढवून घेण्याची भाषा करायची, तसा हा प्रकार होता.
येत्या दोन महिन्यांत शिंदे सरकार कोसळणार, असे भाकीत संजय राऊत यांनी वर्तवल्यावर ‘राऊत यांचे नवे भाकीत’ अशी खिल्ली नितेश यांनी उडवली. विद्यमान सरकार हिंदुत्वाच्या फेव्हिकॉलने चिकटलेले आहे, असेही त्यांनी सांगून टाकले.
नितेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेने पुण्याचे राजकारणी संजय काकडे भडकले. नितेश यांच्यावर मीडियानेच बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले. संजय काकडे यांचे भाजपसाठी काय योगदान आहे, पुण्यातील भाजपच्या कार्यक्रमात ते कुठेच नसताच. राणेंची नाव घेण्याची त्यांची पात्रताही नाही, अशा शब्दांत नितेश यांनी त्यांना ठणकावले.
महाआघाडीच्या वज्रमूठ सभेचे तीन तेरा वाजणार याचे भाकीत नितेश राणे यांनी मुंबईच्या सभेपूर्वीच वर्तवले होते. मुंबईतील बीकेसीची सभा ही शेवटची वज्रमूठ सभा असेल, अशी त्यांनी भविष्यवाणी उच्चारली होती. नेमके तसेच घडले.
नितेश राणे रोजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात संजय राजाराम राऊत असे त्यांचे संपूर्ण नाव घेऊन करतात. नितेश यांची रोजची पत्रकार परिषद म्हणजे उबाठा सेनेवर हल्लाबोल असतो. मुंबई, पुणे, कणकवली, अहमदनगर, सांगली, नाशिक कोठेही ते असले तरी सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली की, त्यांचे मुद्दे ते तातडीने खोडून काढतात. नियमितपणा, मुद्देसूद मांडणी, आरोपांचे खंडन, धारदार प्रश्न आणि बेधडक भाषा यामुळे नितेश यांची कामगिरी प्रभावी
ठरली आहे. विधानसभेत ज्या आक्रमकपणे ते उबाठा सेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करतात, त्याच आवेशाने ते रोज सकाळी उबाठा सेनेवर तुटून पडतात. मोदी सरकारने केंद्रात पूर्ण केलेल्या नऊ वर्षांची कामगिरी भाजपने थेट घरोघरी जाऊन पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. उबाठा सेनेच्या प्रवक्त्यांनी त्याविरोधात थयथयाट सुरू करताच, तुमच्या सर्वोच्च नेत्याला मोदींमुळे आमदारकी मिळाली, याची नितेश राणेंनी आठवण करून दिली. देवेंद्र फडणवीसांनीच मातोश्री २ आणि ठाकरे ट्रस्टला परवानग्या मिळवून दिल्या, याचेही स्मरण करून दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करणाऱ्यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही, अशा शब्दांत त्यांनी उबाठा नेत्यांना ठणकावले. माझा बाप चोरला, असे सतत सांगणाऱ्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत वडिलांचे स्मारक तरी उभारले का?, असा प्रश्न विचारला. तुम्हाला किंचित जरी स्वाभिमान असेल, तर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक सरकारच्या नाही, तर स्वत:च्या पैशातून उभारेन, असे जाहीर करा, असे नितेश यांनी ठाकरेंना आव्हानही दिले. नवीन संसद भवनाची गरज काय, असे विचारणाऱ्या उद्धव यांनी मातोश्री २ ची गरज होती का? हे आधी सांगावे, असेही सुनावले. २० जून हा गद्दार दिन साजरा करा, असे उबाठा सेनेने म्हणताच, आपल्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी केली म्हणून व हिंदू धर्मियांशी व मराठी माणसांशी गद्दारी केली म्हणून २७ जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी त्यांनी त्याच वेगाने पुढे रेटली.
नितेश यांची भाजपचे लढाऊ आमदार म्हणून प्रतिमा आहे. वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्रमक व रोखठोक वृत्तीचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता व परिणामाची पर्वा न करता आपली भूमिका स्पष्ट मांडणे ही राणे परिवाराची खासियतच आहे. नितेश हे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वाभिमान या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. स्वाभिमानच्या माध्यमातून त्यांनी अनेक मेळावे घेतले व हजारो तरुणांना रोजगार मिळवून दिला. ऑक्टोबर २०११ मध्ये मुंबईतील कामगार मैदानावर त्यांना सर्वात मोठा रोजगार मेळावा घेतला व एका दिवसांत २५ हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. ते एमबीए असून त्यांचे उच्च शिक्षण लंडन येथे झाले. सन २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हापासून ते वडिलांना राजकारणात साथ देत आहेत.
[email protected]
[email protected]