विकासभाईंच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील दिपस्तंभ हरपला

सावंतवाडी येथे आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थित मान्यवरांचे भावोद्गार

सावंतवाडी । प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै. विकासभाई सावंत यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील एका तळपत्या दीपस्तंभाला मुकल्याची भावना आज सावंतवाडी येथे आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कधीही न मिटणारे राहील, असेही याप्रसंगी नमूद करण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने येथील आरपीडी प्रशालेच्या सभागृहात कै. विकासभाई सावंत यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत, विकासभाईंच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विकास सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी श्रद्धांजली वाहताना
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत म्हणाले, “सर्व सुखसोई आणि राजकारणातील सर्व व्यासपीठे उपलब्ध असतानाही त्यांनी राजकारणात संन्याशाचे जीवन जगले. मराठा मोर्चामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता आणि मराठा समाजाच्या कामाबाबत त्यांनी आम्हाला एक स्पष्ट दिशा दिली होती. त्यांच्या रूपाने आम्ही एक अभ्यासू नेता गमावला आहे. त्यांनी कुठल्याच क्षेत्रातील व्यक्तीबद्दल इर्षा व्यक्त केली नाही. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम केवळ आरपीडीपुरते मर्यादित नसून, ते सर्वांसाठी होते.”

ॲड. संदीप निंबाळकर यांनी विकासभाईंच्या समाजसेवेचे कौतुक करताना सांगितले, “समाजाशी सातत्याने जोडले जाणारे, स्वतःहून काहीही न स्वीकारण्याच्या स्वभावगुणांचे विकासभाईंसारखे दुर्मिळ नेते होणे नाही. सावंतवाडी-दोडामार्ग येथील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे हे काम असेच पुढे चालू ठेवूया.”
भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी विकासभाईंच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शैक्षणिक चळवळ कशी चालवावी हे विकास सावंत यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्राबद्दल दूरदृष्टी होती. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी आमची इच्छा होती, पण त्यांच्या अकाली एक्झिटने सर्वांच्याच जिव्हारी लागले आहे.”
अशोक दळवी यांनी
कै. भाईसाहेब सावंत यांच्या राजकीय-शैक्षणिक वारसा विकासभाईंनी समर्थपणे पुढे चालवल्याचे सांगितले. ते म्हणाले, “विकासभाई सावंत यांनी महत्त्वाची कामगिरी केली. अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केल्या. राजकीय वाटचालीत त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रातील उणीव कधीही न भरून येणारी आहे.”
ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांनी विकासभाई सावंत यांच्याकडे प्रचंड बौद्धिक क्षमता होती आणि याच जोरावर ते शैक्षणिक क्षेत्रात सक्षमपणे काम करू शकले असे म्हटले.

ते पुढे म्हणाले, “राजकारणात शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच ते राहिले, हे आजच्या राजकारण्यांसाठी शिकण्यासारखे आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद अशा प्रशासकीय पातळीवरील त्यांचे काम सुद्धा अनेकांना लाजवेल असेच होते. त्यांच्या अकाली जाण्याने एक शैक्षणिक क्षेत्रातील हिरा आम्ही गमावला.”
शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सतीश बागवे यांनी विकासभाईंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितले. “विकासभाई सावंत यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी राहील. खेडवळ गावातून मी सावंतवाडीत आलो, त्यांनी सातत्यपूर्ण प्रेरणा दिल्याने मी बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकू शकलो. आरपीडी प्रशालेच्या प्रत्येक बांधकामावर त्यांनी प्रेम केले. त्यांच्या दूरदृष्टीतून त्यांनी आरपीडी प्रशालेचे सोने केले. वक्तृत्व, दातृत्व व कर्तृत्व त्यांच्याकडे प्रचंड होते. असे तेजस्वी व्यक्तिमत्व मी कधीच पाहिले नाही,” असे सतीश बागवे यांनी नमूद केले. यावेळी सुधीर पराडकर, विलास सावंत, शांताराम गावडे, मनोहर देसाई आदी मान्यवरांनीही विकासभाईंना श्रद्धांजली वाहिली.

या श्रद्धांजली सभेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे व्यापार-उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रमोद सावंत, सतीश बागवे, दिनेश नागवेकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, अमोल सावंत, सी.एल. नाईक, कौस्तुभ पेडणेकर, शैलेश नाईक, अशोक दळवी, बबन राणे, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघटनेचे विलास सावंत, संजय लाड, अभिजीत सावंत, माजी मुख्याध्यापक महासंघाचे शांताराम गावडे, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर, संध्या चिटणीस, प्रसाद राऊत, मनोज घाटकर, आनंद नाईक, मनोहर देसाई, गोविंद सावंत, मेघश्याम काजरेकर, बाब्या म्हापसेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, सुधा राणे, शांताराम पारथी, मंथन गवस, संदीप राणे, आरपीडीच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांच्यासह अनेक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.