उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले येथे होता कार्यक्रम
वैभव नाईक वेंगुर्ले येथे असतानाही गेले नाहीत कार्यक्रम स्थळी
स्वच्छतेत कोकणात प्रथम क्रमांक पटकावलेल्या वेंगुर्ला न. प. सह कर्मचाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्ले : प्रतिनिधी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत वेंगुर्ले न.प.ने स्वच्छता पुरस्कार मिळविला या बद्दल आज सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे वेंगुर्ले न.प.तील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित केला होता. मात्र या पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमाकडे वेंगुर्ले येथे असूनही माजी आम. वैभव नाईक यांची पाठ फिरविल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संघटिका सुकन्या नरसुले, महिला संघटिका तथा माजी नगरसेविका सुमन निकम, वेंगुर्ले तालुका महिला संघटीका साक्षी चमणकर, वेंगुर्ले नगरपालिकेचे अधीक्षक अभिषेक पाटील, माजी अधिक्षक संगीता कुबल, उभादांडा सरपंच निलेश चमणकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वेंगुर्ला नगरपालिकेतील एकूण ११८ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी, सूत्रसंचालन माजी जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक तुषार सापळे यांनी तर आभार माजी नगरसेविका सुमन निकम यांनी मानले.
पक्षप्रमुखांचा वाढदिवसाच्या हा कार्यक्रम प्रत्येक शिवसैनिकासाठी महत्त्वाचा होता. वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांशी सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मात्र सेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक हे वेंगुर्ले येथे उपस्थित असतानाही त्यांनी पक्षाच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षप्रमुखांकडेच पाठ फिरवली असे अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखविले.













