न्हावेली-मातोंड पेंडूर मार्गावरील पूलाला भगदाड

कोसळण्याच्या भिती : वाहतूक धोकादायक

न्हावेली । प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे न्हावेली विडी कारखाना ते मातोंड पेंडूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. हा पूल कधीही कोसळू शकतो अशा धोकादायक स्थितीत असल्याने, या मार्गावरील वाहतूक अत्यंत असुरक्षित झाली आहे. तातडीने प्रशासनाने हा पूल निर्धोक करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

या पुलाच्या खराब स्थितीमुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना येथून ये-जा करणे अत्यंत कठीण झाले असून वाहनचालकांना जीवघेण्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि स्थानिक रहिवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.

आमच्या बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हा पूल कोसळल्यास न्हावेली आणि मातोंड पेंडूर दरम्यानचा संपर्क तुटण्याची भीती आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे, पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.