लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापन दिन लांजा शाखेतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लांजा शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम समितीचे संस्थापक कै.श्री.भा.वा.शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी तालुका शाखेमार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे म्हणाले की, शिक्षक समिती हा एक परिवार आहे. कै.श्री.भा.वा.शिंपी गुरुजी यांनी २२ जुलै १९६२ रोजी या संघटनेची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही फक्त शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता शासन दरबारी नेहमीच संघर्ष करत आलेली ही संघटना आहे. लांजा तालुका शाखेमार्फत वर्धापन दिनानिमित्त या अगोदर वृक्षारोपण, बंधारा बांधणे, रुग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवले आहेत याबद्दल संतोष पावणे यांनी तालुका शाखेचे अभिनंदन केले.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास ज्येष्ठ सल्लागार रमेश सावंत, मधुकर चौगुले, तुकाराम कोलापटे, तुकाराम कदम, संतोष वारंग, पांडुरंग जोशी, शांताराम आग्रे, इंद्रनील वरूणकर, शाळेचे मुख्याध्यापक विजय विश्वासराव, महिला प्रतिनिधी सौ.संजना वारंग, सौ.प्रिती जोशी,श्रीम. सविता पाटील आदी समिती पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दिलीप दिवाळे यांनी केले तर स्वागत व आभार तालुका सचिव दिनेश झोरे यांनी मानले.












