खेड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; १० गावांतील १७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

खेड (प्रतिनिधी) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे खेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असून सध्या तालुक्यातील १० गावांतील १७ वाड्यांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल १०६१ ग्रामस्थांची तहान सध्या टँकरवरच अवलंबून असल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
तालुक्यातील अनेक भागांत विहिरी, नाले आणि इतर जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून टँकरद्वारे तात्पुरती दिलासा व्यवस्था करण्यात येत आहे.
कासई-बोरवाडी येथील सर्वाधिक १३६ ग्रामस्थ सध्या पाणीटंचाईने त्रस्त असून या भागाला नियमित टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय घेरारसाळगड येथील भराडे धनगरवाडीतील ९० ग्रामस्थ, निमणी धनगरवाडीतील १६, कशेडी बंगला येथील ५९, बोरटोक येथील ३९, खवटी खालची धनगरवाडीतील ९० तसेच वरची धनगरवाडीतील ५५ ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
तसेच सवेणी धनगरवाडीतील ३५, केळणे भोसलेवाडीतील ३९, मांगलेवाडीतील ६७, तळे धनगरवाडीतील ४२, तिसंगी खांडेकरवाडीतील ९५, धनगरवाडीतील ८५, हुंबरी म्हाळुंगे धनगरवाडीतील १७ आणि तुळशी बुद्रुक येथील ७० ग्रामस्थांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
उन्हाचा कडाका वाढत असल्याने भूजल पातळीतही घट होत असून उपलब्ध जलस्त्रोत झपाट्याने आटत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या सात दिवसांत पंचायत समितीच्या पाणी विभागाकडे टँकरसाठी एकही नवीन अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, ज्या गावांकडून मागणी येईल त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.