साखर विद्यालयात वृक्षारोपण, वृक्षदिंडी कार्यक्रम

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, मार्गदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील साखर माध्यमिक विद्यालयात “एक पेड मॉं के नाम”,”हरित महाराष्ट्र- समृद्ध महाराष्ट्र ” उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय हरितसेनेच्यावतीने वृक्षारोपण, वृक्षदिंडी व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
सुरूवातीस मुख्याध्यापक शरदचंद्र जाधव यांच्या हस्ते वृक्षपालखीचे पूजन करून विद्यालय ते पोसरेगाव, गणेश मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. पोसरे नाका येथे शिक्षण संस्थेचे खजिनदार संतोष उतेकर, सौ.अनिता अनंत सुतार, सौ.कमल दत्तात्रय राजमाने, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे, शिक्षणप्रेमी अजय राजमाने, दिपक राजमाने यांनी पालखीचे पूजन केले. कु.वेदिका सुतार, प्रचिती राजमाने, सिमरन मोहिते या विद्यार्थ्यांसमवेत सर्व विद्यार्थ्यांनी “वृक्ष लावा घरोघरी,समृद्धी येईल तुमच्यादारी”, “वृक्ष असती वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करा तीचे रक्षण ” यासह विविध घोषणा,पर्यावरण प्रतिज्ञा, पर्यावरण आरती, गीते यांचे गायन करून परिसरात जनजागृती केली. हरितसेना प्रमुख रवींद्र गावकर, प्रभाकर राजमाने, शरदचंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधात होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. मराठी शाळा पोसरे तांबड येथील विद्यार्थी-शिक्षक वर्ग यांनी वृक्ष पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण आरती, घोषणा व गीतांचे गायन करून वृक्षदिंडीत सहभागी होऊन आनंद लुटला. शिक्षण संस्थेचे खजिनदार संतोष उतेकर, सौ.अनिता सुतार, अजय राजमाने, लक्ष्मी-नारायण स्टोअर्स पोसरे, कमाल खेरटकर, प्राथमिक शाळा पोसरे तांबड,यांनी आर्थिक सहकार्य व पालक बशीर कडवईकर, सचिन शिंदे, चित्रा मोरे यांनी चॉकलेटचे वाटप केले. पोसरे येथील उद्योजक संजय शंकर राजमाने यांनी दिलेल्या अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.