ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मिळणार मोफत तपासणीचा लाभ
सावंतवाडी: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोल्हापूर मंडळासाठी मंजूर झालेली ‘कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन’ (Cancer Diagnostic Van) आता सावंतवाडी तालुक्यात दाखल होणार आहे. ही विशेष व्हॅन ग्रामीण आणि शहरी भागातील संशयित कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी आणि निदान करणार आहे. यामुळे कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचारात गती येईल, अशी अपेक्षा आहे.
ही कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सावंतवाडी तालुक्यात तीन ठिकाणी उपलब्ध असेल यात
२५ जुलै रोजी ही व्हॅन प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे असेल. बांदा, निरवडे आणि मळेवाड कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तर २६ जुलै रोजी ही व्हॅन प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगेली येथे उपलब्ध असेल. सांगेली आणि आंबोली कार्यक्षेत्रातील नागरिकांनी येथे येऊन तपासणी करून घ्यावी.
तसेच २८ जुलै रोजी ही व्हॅन उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे असेल. सावंतवाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या दिवशी व्हॅनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात ३० वर्षांवरील संशयित व्यक्तींची तोंडी तपासणी (oral examination) केली जाईल. महिलांसाठी विशेषतः स्तन (breast) आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची (cervical cancer) तपासणी केली जाणार आहे. या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत असतील.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होईल, ज्यामुळे उपचारांना वेळेत सुरुवात करता येईल. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे आणि तालुका आरोग्य अधिकारी, सावंतवाडी, डॉ. रमेश कर्तस्कर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.










