देवगड / प्रतिनिधी
देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेत पवनचक्की गार्डन येथे वाहन पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यासाठी तातडीने जमीन मोजणी करण्याची सूचना करण्यात आली. तसेच मोकाट गुरांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविण्याबरोबरच गुरांना टॅग लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या गुरेमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. याच सभेत रखडलेल्या विकासकामांबाबत, पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या दरांबाबत आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबतही सविस्तर चर्चा झाली.
देवगड-जामसंडे नगर पंचायतीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, बांधकाम समिती सभापती रोहन खेडेकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, मुख्याधिकारी गौरी पाटील, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे आदी उपस्थित होते.
सभेत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी नगर पंचायतीच्या हद्दीतील रखडलेल्या विकासकामांवरून प्रशासनाला धारेवर धरले. कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ दिली जाते, मात्र त्यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई केली जात नसल्याने नगर पंचायतीची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या डागडुजीबाबत मागील सभेत दिलेले आश्वासनही अद्याप पूर्ण झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत पुन्हा उघडे पडत असून नगर पंचायतीकडे येणाऱ्या रस्त्यावरही मोठे खड्डे असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनीही रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत रोष व्यक्त करत, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच खड्डे बुजविणार का, असा सवाल उपस्थित केला. यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू व अभियंता विवेक खोत यांनी आवश्यक ठराव होताच उपलब्ध निधीतून खड्ड्यांच्या डागडुजीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सभेत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जामसंडे येथे उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पातील घरांच्या वाढीव किमतीचाही मुद्दा उपस्थित झाला. या संदर्भात लाभार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीस नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची खंत व्यक्त करत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी वाढीव दर सर्वसामान्य लाभार्थ्यांना परवडणारे नसल्याचा आरोप केला. यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी म्हाडाने निश्चित केलेल्या दरानुसारच लाभार्थ्यांना घरे देण्यात येतील तसेच या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि लाभार्थी यांची संयुक्त विशेष सभा घेऊन सर्व शंकांचे निरसन करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सफाई विभागाच्या कामकाजावरही सभेत चर्चा झाली. काही कंत्राटी सफाई कर्मचारी मद्यपान करून कामावर येतात, कामावर अनुपस्थित राहूनही त्यांना मानधन दिले जाते तसेच लेखी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुकादमाकडून नगरसेवकांनाच धमक्या दिल्या जात असल्याचाही त्यांनी गौप्यस्फोट केला. यावर कामचुकार किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येईल, तर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार करून आवश्यक कारवाई केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. अशा कारवाईत नगरसेवक कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचेही सभागृहाने स्पष्ट केले.
याशिवाय पवनचक्की गार्डन येथे वाहन पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना सभापती बुवा तारी यांनी केली. तसेच मोकाट गुरांच्या समस्येवर सुरू असलेल्या कारवाईला गती देत गुरांना टॅग लावण्यास नकार देणाऱ्या गुरेमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. नगर पंचायतीच्या हद्दीतील लघुनळ योजनांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग राबविण्याबाबतचा ठरावही सभागृहात मंजूर करण्यात आला.













