(माझे कोकण/ संतोष वायंगणकर)
महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये जर कोणता नविन कोणताही प्रकल्प येणार असेल तर त्या येणाऱ्या प्रकल्पावर त्या-त्या भागातील राजकीय नेते, पुढारी, सामाजिक संघटना या सर्वांकडुन चर्चा होते. संवाद होतो. येणाऱ्या प्रकल्पाच्यासंबंधी फायद्या-तोट्यावर जरूर चर्चा होते. परंतु आपल्या भागात प्रकल्प कसा येईल यासाठी प्रयत्न होतात. परंतु तेच महाराष्ट्रातील कोकणात कोणत्याही प्रकल्पाचे नुसते सूतोवाच झाले तरीही कोणता प्रकल्प आहे काय नुकसान होणार आहे ? रोजगाराची संधी काही आहे का ? यातल्या कोणत्याही गोष्टींची आजवर कधी चर्चा झाली नाही कधी होत नाही. काही राजकीय नेते, पुढारी, काही तथाकथीत सामाजिक कार्यकर्ते, काही संस्था या कोकणाचे कैवारी असल्यासारखे येणार विरोधाची भाषण ठोकणार आणि कोकणात नव्याने काही आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता निघून जाणार. कोकणात आजवर प्रत्येकवेळी विरोधासाठी येणाऱ्या काही ठराविक संस्था काही ठराविकच राजकीय नेते, पुढारी यांचा फक्त एकच अजेंडा …विरोध बस्स! एवढच एकमेव धोरण. यामुळे कोकणात नव्याने कशाचीही उभारणी होत नाही. कोणताही उद्योजक कोकणात प्रकल्प उभारायला तयार नाही याच कारण कोकणात कोणताही प्रकल्प कोणत्याही उद्योगाने आणायचा ठरविला तरी त्याला विरोध होतो. त्यामुळे सहाजिकच कोकणात प्रकल्प येतच नाही. काही उभं रहात नाही.
जेव्हा १९९७ साली तत्कालिन राज्यसरकारने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला तेव्हाही काही संस्था आणि नेत्यांनी फक्त विरोध दर्शवला. कोकणची संस्कृती बिघडवणारे पर्यटन नको म्हणत अनेकांनी नाक मुरडली. याच विरोधातून कोकणातील पंचातारांकित हॉटेल प्रकल्पांना विरोध दर्शविला. तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा, भुमीपूत्रांचा बुद्धिभेद केला. यामूळे एक-दोन नव्हे तब्बल ३२ वर्षे ताज, ओबेरॉय, पंचतारांकित हॉटेल प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. कोकणातील सर्वच प्रकल्पांना होणारा विरोध हा राजकिय विरोध आहे. प्रकल्पांना राजकिय विरोध करणारे काही ठराविकच चेहरे आहेत. गेल्या तीस वर्षात कोकणातील कोणत्याही प्रकल्पाला विरोध या-ना त्या प्रकारे तेच विरोध करत असतात. काही ठराविक विचारवंतांना विरोधासाठी कोकणचीच भूमी आवडते. महाराष्ट्रातील इतर भागात अशाच कोणी काही ऐकतच नाहीत. याच कारण महाराष्ट्रातील इतर भागातील जनता सगळयांच एैकूण घेते. परंतु आपल्या हिताच काय आहे हे समजून घेते. विचार करते आणि आपल्या भागाचा विचार करणारी जनता आहे. परंतु कोकणात कशाही गोष्टीला विरोध करण्यात पुढाकार घेण्यात आनंद माणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एखाद्या गावच्या वाडीत जाणाऱ्या पायवाटेचही मोठ राजकारण केलं जाईल. त्यासाठीचा श्रेयवादही होईल अशा या नकारात्मक मानसिकता खरंतर बदलायला हवी. परंतु मानसिकता तशी बदलत नाही.
कोकणात दुसरी एक बाब आवर्जुन सांगाविशी वाटते. कोकणात येणारा एखादा प्रकल्प असेल तर त्याला विरोध होईल. परंतु त्या गावातील जमीन परप्रांतियांना कोकणातील माणूस सहज विकून मोकळा होतो. कोकणच्या किनारपट्टीवरचे सातबारा तपासले तर कोकणातल्या किनारपट्टीवर परप्रांतियांनी शेकडो एकरचा किनारा खरेदी केला आहे. स्थानिकांनी कोणी जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याला जमीन कोणी देणार नाही. परंतु परप्रांतियांना अगदी स्वस्तात ही जमीन विक्री करून मोकळे होतील ही वस्तुस्थिती आहे. कोकणाच अर्थकारण बदलण्याची ताकद असणारा महत्वाकांक्षी प्रकल्प २००६ साली सी वर्ल्ड प्रकल्प कोकणात उभारण्याचा निर्णय तेव्हाच्या राज्यातील सत्तास्थानावर असलेल्या सरकारने केला. भूसंपादनासाठी १०० कोटीची आर्थिक तरतुद करण्यात आली. १०० कोटी सी वर्ल्ड प्रकल्पासाठी सिंधुदुर्गकडे वर्ग करण्यात आले काय घडल ? विरोध करण्यात आल्या, जमीन लाटल्याचा कथीत आरोप करण्यात आले होते. स्थानिकांना खोट-नाट सांगून उठवून घालण्यात आले. ज्यांना निवडणुकीत राजकारणासाठी फायदा करून घ्यायचा होता त्यांनी तो करून घेतला. परंतु नुकसान मात्र शंभर टक्के कोकणच झालं. ज्या भागात हा सी वर्ल्ड प्रकल्प होणार होता त्या सी वर्ल्ड प्रकल्पाने हजारोंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणाऱ्या होत्या. परंतु लोकांनी विरोध केला. सी वर्ल्ड सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. यातून फक्त आणि फक्त कोकणच नुकसान झालं. चिपी विमानतळाला असाच विरोध होत राहिला. काळ्या कातळावर विमानतळ प्रकल्प उभा रहात असताना किती विरोध, किती आंदोलन काय-काय घडल? मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा रहाण्यापूर्वी केव्हाचाच चिपीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहू शकला असता. परंतु इथेही, विरोध करणारे नेहमीचेच विरोध करणारे पुढे होते. ही देखिल जुनी वृत्तपत्राची कात्रण चाळली तरी समजून येईल आणि या अशाच काहींकडुन सत्तेवर असणाऱ्यांनी केलं काय ? हा प्रश्न विचारला जातो. दुर्दैवाने विरोध करणारे तेच-तेच परत काय केलात ? म्हणून प्रश्न विचारतात हे कोकणच दुर्दैव आहे. आता तरी कोण कशासाठी, कोणामुळे विरोध करतोय हे देखिल समजुतदार कोकणवासीयांनी समजून घेतले पाहिजे.












