शहरातील सीएनजी पंपाबाबत रिक्षा व्यावसायिकांची तीव्र नाराजी

लांजा तहसीलदारांना निवेदन सादर
संतोष कोत्रे

लांजा-: शहरातील एकमेव असलेल्या सीएनजी पंपामधून योग्य प्रेशरने पुरवठा होत नसल्याने रिक्षाव्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून शक्य असल्यास आणखी एका सीएनजी पंपाची व्यवस्था करावी अशी मागणी लांजा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
लांजा शहरात असलेल्या एकमेव सीएनजी पंपाबाबत रिक्षाव्यवसायिकांमधून गेल्या अनेक महिन्यांपासून नाराजीचा सूर उमटत आहे. हंगामी काळात आणि विशेषतः गणपती उत्सव ,मे महिन्याच्या काळात ज्यावेळी रिक्षा व्यवसायिकांचा व्यवसाय असतो, त्यावेळी त्यांना पुरेशा प्रमाणात आणि प्रेशरने सीएनजी पुरवठा केला जात नाही. परिणामी या रिक्षाव्यवसायिकांना तासनतास आपला धंदा, व्यवसाय सोडून सीएनजी साठी रांगेत उभे राहावे लागते. याचा थेट परिणाम आमच्या रिक्षा व्यवसायावर होतो असे त्यांचे म्हणणे आहे .
मुंबई गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहने धावत आहेत. लांजा येथे असलेल्या सीएनजी पंपावर रिक्षाव्यवसायिकांना सीएनजी साठी सात ते आठ तास रांगेत उभे राहावे लागते .त्यात पूर्ण प्रेशरने सीएनजी उपलब्ध होत नाही.आणि यामुळे रिक्षा व्यावसायिक हैराण झालेले आहेत. सीएनजी उपलब्ध नसल्याने वाहनांच्या रात्रभर लांबच लांब रांगा लावलेल्या असतात. त्यामध्ये चार चाकी वाहनांसह रिक्षा व्यावसायिकांना सात ते आठ तास आपला व्यवसाय सोडून थांबावे लागत असल्याने मोठी गैरसोय होते. त्याचप्रमाणे व्यवसायावर मोठा परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे .

गेल्या काही वर्षांपासून ही रिक्षा व्यावसायिकांची समस्या आहे .यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सीएनजी वरील सर्व वाहने गॅस भरण्यासाठी या ठिकाणी या पंपावर येत असतात. त्यामुळे काही कालावधीत प्रेशर कमी होऊन कमी दाबाने, गॅस टाकीमध्ये पूर्ण क्षमतेने भरला जात नाही .त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना पुन्हा पुन्हा लाईन मध्ये नंबर लावून गॅस भरावा लागतो .
आणि म्हणूनच संबंधित सीएनजी पंप व्यावसायिकाला योग्य ती समज द्यावी .तसेच शक्य असल्यास अजून एक अतिरिक्त सीएनजी पंपाची व्यवस्था करावी, जेणेकरून आमची कायमच होणारी गैरसोय दूर होईल.अशी मागणी लांजा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष लहू कांबळे यांनी केली आहे .यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.