छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे कृषी विभागाला निवेदन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
सन २०२४-२०२५ मधील खरीप हंगामामधील काढणी पश्चात भात पिकाचे नुकसान झाले होते. व त्यांचे विमा कंपनीकडून पंचनामे होवून सुदधा वर्ष झाले तरी अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. वेंगुर्ले तालुक्यात १८५४ लाभार्थी असून त्यांना सुमारे २७ लाख ९९ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ती मिळाली नाही म्हणून सन २०२५-२०२६ चा खरीप हंगामातील भात पिक विमा उतरविण्यास शेतकरी तयार नाहीत अशी शेतकऱ्यांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना सिंधुदुर्ग या संघटनेने लेखी निवेदनाद्वारे कृषी विभागाकडे मांडली आहे.
सन २०२४- २०२५ ची खरीप हंगामातील पात्र भात पीक विमा नुकसान भरपाई अजून पर्यंत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. त्याच प्रमाणे याचा परिणाम सन २०२५-२०२६ च्या खरीप हंगामाचा भातपिक विमा उतरविण्यात परिणाम होणार आहे. जवळजवळ चालू हंगामाच्या विमा भरण्याची अंतिम तारिख जवळ आली असून अवघे १५ दिवस राहिलेले असून शेतक-याना मागील विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे चालू वर्षीचा विमा भरण्यास शेतकरी उत्सुक नाहीत.
शासनाने नेमून दिलेली भारतीय कृषी विमा कंपनीकडील निकष पाहता शेतकरी मोठ्या प्रमाणात पिक विमा उतरविण्यासाठी सहभागी होतीलच ही सुदधा शंका असून या निकषांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हयामधील भातपिक घेणारे शेतकरी पूर्णतः संभ्रमात असून या सर्व बाबीचा विचार करुन जेणेकरुन शेतक-यांचे नुकसान होऊ नये. याची जबाबदारी विमा कंपनीने व कृषी खात्याने घेऊन शेतक-यांना सहकार्य करावे. व गेल्या वर्षीची नुकसान भरपाई शेतक-यांना तात्काळ देण्यात यावी. असे या निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामसुंदर राय यांच्यासह अन्न शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते.
चौकट : २०२४ – २०२५ मधील आंबा पिक योजनेमध्ये प्रस्ताव पेड म्हणून दाखवत असून ते काही प्रस्ताव माघारी आले आहेत. ते चालू वर्षी २०२४-२५ चा आंबा हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना सरसकट विमा कंपनीकडून पिक विमा नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही संघटनेने केली आहे.











