फोंडाघाट| कुमार नाडकर्णी — दापोली कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे)अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कृषिसंजीवनी व कृषी समृद्धी गटाने कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावात कृषि संशोधन केंद्र येथे कृषी तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्या दरम्यान कृषी अभियांत्रिकी विभाग विषय विशेषज्ञ डॉ. एस. व्ही. पाठक (कृषी महाविद्यालय, दापोली) व डॉ. प्रविण झगडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विकसित केलेल्या कृषी अवजारे व यंत्रे यांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये पंकज चिखलणी अवजार, अंकुर दातेरी फावडा, स्वस्तिक अवजार, सुलभ समतलरेषा आरेखन यंत्र, कोनोविडर (शंकु कोळपे), खणती, नूतन आंबा झेला, अतुल चिकू झेला, अमर बांडगुळ कटर, नारळ सोलणी यंत्र, वैभव विळा यांचा समावेश करण्यात आला होता. याबरोबरच भातशेती यांत्रिकीकरण या विषयावर डॉ.एस.व्ही.पाठक यांचे उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यासोबतच पारंपरिक भात शेतीपद्धती आणि आधुनिक भातशेती पद्धती यामधील फरक चलचित्राद्वारे दाखविण्यात आला. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्यानंतर विद्यार्थ्यांनी भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक बिजलीनगर, फोंडाघाट येथे दाखवले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषिसंजिवनी गटाचे अपुर्व आयनारकर, ॲरोन डायस, पियुष वाजे, प्रजय वराडकर, रोहन वेळीप, विभव सिनकर, साईराज गावकर, सार्थक शिर्के, सिद्धार्थ जाधव तसेच कृषी समृद्धी गटाचे श्रीकेश राजीव, ओम कुमार, बजरंग जाट, आदित्य शेखर, प्रतिक मोहंता, सुमित गर्ग, नागेश, राहुल यादव व वेल्सन फर्नांडिस यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, केंद्र प्रमुख, डॉ. विजय शेट्ये, कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.











