मोडी लिपी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव…
वेंगुर्ले l प्रतिनिधी :छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लहान वयातच देव,देश धर्म याच्या रक्षणासाठीचे धडे गिरवले ज्या मुळे हे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. हीच प्रेरणा घेऊन पुढे मराठा साम्राज्याचा विस्तार अखंड भारतभर झाला. शिवरायांचा हाच प्रेरणादायी इतिहास कार्यक्रमातून एका व्याख्यानामधून सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर उलगडणार आहे. यासाठी येत्या शनिवार २६ जुलै रोजी सकाळी १० वा. कुडाळ येथील मराठा समाज हॉल, कुडाळ सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी शिवशंभू विचार मंच, महाराष्ट्र राज्याचे संयोजक श्री सुधीर थोरात उपस्थित राहणार आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज- एक प्रेरणा स्त्रोत’ या व्याख्यानात शिवरायांचे जीवन चरित्र आणि त्यांची दुर्गसंपदा या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. शाळा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. थोड्याशा अपयशाने, अभ्यासाच्या ताणामुळे येणारे नैराश्य कसे झुगारून देऊ शकतो याचे प्रत्यक्ष विचार विद्यार्थ्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे दुर्गविज्ञान हे स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये परमोच्च स्थानी होते, आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य उल्लेख करतात ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’. मराठा साम्राज्याची ओळख असणाऱ्या एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोकणामधील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश झाला आहे. कार्यक्रमात यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीच चे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. सचिन जोशी खास मार्गदर्शन आणि चर्चासत्र घेणार आहेत.
या मुळे सिंधुदुर्ग आणि कोकण मधील दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व शिवशंभू विचारमंच आपणा सर्वांना ही आवाहन करत आहे. की आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे. तसेच या निमित्ताने सिंधुदुर्ग आणि कुडाळ मधील मोडी लिपी चे खास प्रशिक्षण घेऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कुडाळ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
शिवाय प्रसिद्ध मोडी लिपी अभ्यासक श्री पंकज भोसले मोडी लिपी बाबत चे खास प्रदर्शन सुद्धा लावणार आहेत आणि मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत.
या कार्यक्रमाचे महत्व आणि उपयोगीत्व अमूल्य आहे. हे जाणून समस्त सिंधुदुर्ग वासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग तसेच समस्त दुर्ग संवर्धक संस्थांकडून करण्यात आले आहे.












