कामगाराचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण
खेड | प्रतिनिधी :
लोटे एमआयडीसीमध्ये आज शनिवारी पुन्हा एकदा भीषण स्फोटाची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. विनती केमिकल कंपनीमध्ये झालेल्या या स्फोटात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी असलेल्या लोटे एमआयडीसीमधील विनती केमिकल कंपनीमध्ये हा दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट एवढा तीव्र होता की परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.
मृत कामगाराचे नाव समीर खेडेकर असून ते लोटेतील घाणेकुंठ येथील रहिवासी होते. ते विनंती केमिकल कंपनीमध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. स्फोटानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा दुर्देवी अंत झाला.
ही घटना मागील काही महिन्यांतील तिसरी ते चौथी मोठी दुर्घटना असून एमआयडीसीमधील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक माहितीमधून हा स्फोट बॉयलरमधून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटामुळे कंपनीच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे लोटे एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून, स्थानिक प्रशासन व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. औद्योगिक अपघातांची सतत घडणारी साखळी आणि कामगारांच्या सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.












