‘माझा युवा भारत’ आणि ‘पब्लिक रिलेशन फाउंडेशन’ चे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘माझा युवा भारत’ आणि ‘पब्लिक रिलेशन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यात ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये वैचारिक घुसळण आणि प्रभावी अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेसाठी ‘आजच्या युवकांसमोरील आव्हाने’, ‘आजच्या भारतात स्त्री खरंच सुरक्षित आहेत का?’, ‘येवा कोकण आपलोच असा, पण तो कोकण टिकवण्यासाठी आमची जबाबदारी काय?’ आणि ‘कधी मिळेल का कोकणातल्या तरुणाला त्याच्याच कोकणातल्या मातीत रोजगार?’ हे चार ज्वलंत विषय निवडण्यात आले आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील १८ ते ३० वयोगटातील युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक स्पर्धकाला मनोगत व्यक्त करण्यासाठी सात मिनिटांचा कालावधी मिळेल. सहभागासाठी ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत नावनोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेसाठी येताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा कॉलेज आयडी कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे.
विजेत्यांना अनुक्रमे रुपये ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी फिजा (मो. ७२१८७६६९२६) किंवा कामाक्षी (मो. ९५७९६९५८०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार निर्भीडपणे मांडावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










