सावंतवाडी : सावंतवाडी शहरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या गौरेश दिलीप कामत (वय ३१, रा. उभा बाजार, सावंतवाडी) याला हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुन्हा ताब्यात घेऊन त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सोडण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी (SDM) सावंतवाडी यांनी १७ मार्च २०२५ रोजी गौरेश कामत याला एक वर्षासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाची अंमलबजावणी करत असताना, गौरेश कामत याला त्याच्या आई-वडिलांनी पुणे येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, तो तिथून पळून गेला होता. २६ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो सावंतवाडी शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गौरेश कामत याला ताब्यात घेतले. त्याला हद्दपारीच्या आदेशाची प्रत बजावण्यात आली असून, त्याच्या वडिलांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिस हवालदार धुरी आणि हवालदार गलोले यांच्या पथकाने सरकारी वाहनाने गौरेश कामत याला त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितपणे सोडले आहे.
विशेष म्हणजे, हद्दपारीचा मूळ आदेश १७ मार्च २०२५ रोजी जारी झाला असला तरी, तो आदेश गौरेश कामत याला ज्या दिवशी बजावण्यात आला, म्हणजेच २७ जुलै २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी लागू असेल. त्यामुळे, यापुढे जर त्याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.










