सावंतवाडीतील एसपीकेसह अन्य एका महाविद्यालयासोबत करार
सावंतवाडी । प्रतिनिधी: मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदव्या घेता येणार आहेत. व्यस्त जीवनशैलीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला असून, त्यात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा समावेश आहे.
याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी सोमवारी पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. अनिल बनकर, प्रा. दिलीप भारमल, प्रा. मंदार भानुसे, डॉ. लीलाधर बन्सोडे, प्रा. सुभाष वेलिंग आदी उपस्थित होते.
डॉ. सरगर यांनी सांगितले की, “धकाधकीच्या जीवनात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून आणि पदवीपासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या चमूने हा पुढाकार घेतला आहे.” १२वी नंतर आणि पदवीनंतरही हे शिक्षण घेता येणार आहे. एम.कॉम आणि एम.एस.सी. सारख्या तब्बल २८ अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. हे अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत.
एकाच वेळी दोन पदव्यांसाठी प्रवेश घेता येणार असला तरी, एका पदवीसाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल, तर दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी उपस्थितीची कोणतीही अट असणार नाही. संबंधित विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनेही शिक्षण घेऊ शकतील.
विशेष म्हणजे, हे अभ्यासक्रम थेट मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून चालवले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. या पदव्या नियमित अभ्यासक्रमांच्या आणि पारंपरिक पदवीच्या तोडीच्याच असतील, असेही डॉ. सरगर यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोणत्याही केंद्रातून विद्यार्थी ही पदवी पूर्ण करू शकतात. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर यांसारख्या सात जिल्ह्यांमध्ये केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोकणात पहिल्यांदाच श्री पंचम खेमराज महाविद्यालयासोबत हा करार करण्यात आल्याचा मान मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी लखमसावंत भोसले यांनी हा करार स्वीकारला.











