रस्त्यावरील खड्डे बुजवून त्यांनी जपली ‘सामाजिक बांधिलकी’ 

अपघात टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा पुढाकार 

 सावंतवाडी । प्रतिनिधी : काही महिन्यांपूर्वी श्रीराम वाचन मंदिरासमोरील रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. जोरदार पाऊस आणि सततच्या वाहतुकीमुळे आठ दिवसांपूर्वी बुजवलेले खड्डे पुन्हा तयार झाले होते, ज्यामुळे शाळकरी मुले, वाहनचालक आणि नागरिकांना त्रास होत होता.

यावर तात्काळ कार्यवाही करत, काल रात्री सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हे खड्डे पुन्हा सिमेंट काँक्रीट टाकून बुजवले. आज ऊन पडल्याने सिमेंट काँक्रीट घट्ट झाले असून, ते काही काळ टिकेल अशी अपेक्षा आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सांगितले की, “जर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडल्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते खड्डे पुन्हा बुजवले जातील, पण एकही अपघात होऊ देणार नाही.” या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.