निवृत्त शिक्षकाला बाजारात अर्धांगवायूचा झटका

‘सामाजिक बांधिलकी’कडून मदतीचा हात

सावंतवाडी : निरवडे हायस्कूलचे निवृत्त इंग्रजी शिक्षक विश्वकांत गणपत तारी यांना आज सावंतवाडी येथील बाजारात तपासणीसाठी आले असताना अचानक अर्धांगवायूचा झटका आला आणि ते खाली पडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

यानंतर त्वरीत येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक विजय वेंगुर्लेकर, सनी पोकळे आणि नगरपालिका कर्मचारी गणेश खोरागडे यांनी तातडीने धाव घेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि रूपा मुद्राळे यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी घटनास्थळी त्वरित पोहोचून वृद्ध शिक्षकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉ. वजराटकर यांनी तानाजींवर उपचार केले असता, त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे निदान झाले. पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथे हलवावे लागणार असल्याचे डॉ. वजराटकर यांनी सांगितले.
दरम्यान, श्री. तारी यांच्या नातेवाईकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

त्यांचे नातेवाईक मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. तरी, श्री. विश्वकांत गणपत तारी यांचे कोणी नातेवाईक असल्यास किंवा त्यांना ओळखत असल्यास, त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय किंवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.