डेरवण येथे ९५ वी जयंती
चिपळूण (प्रतिनिधी) : गुरूंच्या कृपेने साधलेले सर्व यश स्वतःचे न मानता, संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण करणारे उदात्त व्यक्तिमत्त्व म्हणजे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर हे होत. असे गौरवोद्गार वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. बिंदा दत्तात्रय परांजपे यांनी काढले. त्या डेरवण येथे भक्त श्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मणराव वालावलकर यांच्या ९५ वी जयंती निमित्त पार पडलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, सद्गुरू दिगंबरदास महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्तीला केवळ ध्यानापुरती न ठेवता, ती शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि संस्कृती रक्षणाच्या कार्यातून कृतीत उतरवली. त्यांच्या औदार्यातून इंग्रजी माध्यमाची शाळा, गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा, तसेच कोकणातील रुग्णांसाठी जीवदान ठरलेले रुग्णालय उभारले गेले. गरीब-श्रीमंत भेद न करता हजारो रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळू लागल्या. कीर्तीची अपेक्षा न ठेवता केवळ देत राहणारे, कर्मयोगावर श्रद्धा ठेवणारे आणि सेवेतच भक्ती मानणारे हे विनम्र व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीचा खरा अर्थ म्हणजे त्यांच्या आदर्शांतून शिकून समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा संकल्प करणे हा होय, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी डॉ. बिंदा परांजपे यांचा रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर संचालिका सौ. शरयु यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, प्राचार्य सौ. तेजल सुर्वे, प्राचार्य श्री.चंद्रशेखर एल. आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाच्या आवारात असलेल्या लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली.
चौकट-
या कार्यक्रम प्रसंगी संस्कृत, स्पॅनिश, जर्मन आणि इंग्रजी भाषेमधुन विद्यार्थ्यांनी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांच्या जीवनावर चरित्रावर भाषणे सादर केली. विविध भाषेतील उत्तम शब्द, उच्चार आणि सुंदर शैलीत सादर केलेली भाषणे ऐकून उपस्थित पाहूणे आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.













