रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे कल्याणकारी सरकार आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला होतं, तसं कल्याणकारी सरकार. अडचणी असतील त्या आपण दूर करूया. सामान्य असो वा मोठा व्यापारी या सर्वांना योग्य तो सन्मान मोदींच्या राज्यात, देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात मिळणार, त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मोदी सरकारला नऊ वर्ष झाली. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद यापूर्वी मोदी साहेबांना मिळाले तसे २०२४ सालीसुद्धा मिळावेत. आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करू, पण तुम्ही सुद्धा मोदी साहेबांचे हितचिंतक, मित्र, फिलॉसॉफर, गाईड या माध्यमातून आपले सगळ्यांचे आशीर्वाद मिळू देत, असे प्रतिपादन रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब माने यांनी केले. मोदी @ 9 अंतर्गत भाजपच्या वतीने गुरुकृपा मंगल कार्यालयात व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळासाहेब माने यांनी व्यापाऱ्यांना संबोधित केले.
बाळासाहेब माने म्हणाले की, आजच्या व्यापारी बैठकीचे नियोजन काय आहे याची आपल्या कल्पना आहेच. आपणसुद्धा अनेक चांगल्या उपयोगी सूचना केल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपली मन की बातमध्ये देशभरातल्या विविध विषयाच्या माध्यमातून देशवासीयांसमोर व्यक्त करतात. आज व्यापाऱ्यांची मन की बात ऐकण्याकरता आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
या प्रश्नांना सोडवण्यासाठी यंत्रणा पाहिजे. मी पक्षाच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये असं म्हणेन की २५ वर्षांपूर्वीची रत्नागिरी आणि आज बदललेली रत्नागिरी ही मला वाटते कुणामुळे नाही बदलली, स्वतः व्यापाऱ्यांच्या ताकतीवर बदलली आहे. फार काही कोणी याच्यामध्ये केलं नाही. फिनोलेक्स कंपनीव्यतिरिक्त कोणताही नवीन उद्योग आला नाही. बाकीचे उद्योग आता चालले आहेत. खरंतर व्यापारातील समस्या, अडचणी सोप्या व्हाव्यात. कारण अनेक वर्ष आपण जर पाहिले केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक व्यवस्था, सिस्टीम असते. अनेक वेळेला हे प्रशासन आहे. आपल्याशी संबंधित जे काही विभाग येतात, त्यात लाल फितीचा कारभार होता. काही कायदे होते आणि त्या कायद्यांमुळे व्यापारी हैराण होता. त्याला त्या ठिकाणी आनंदाने व्यापार करता येत नव्हता. पण मी अभिमानाने सांगेन तुम्ही सुद्धा त्याला सहमत असाल की पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सरकार, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांचे सरकार आले त्यावेळेला खऱ्या अर्थानं व्यापार उद्योजकाला न्याय मिळाला. अनेक कालबाह्य झालेले कायदे रद्द केले, सोपे कायदे आणले. जीएसटीचा कायदा हा चांगला आहे. त्यासाठी सूचना आल्या आहेत. नक्कीच त्या सूचनांवर अंमलबजावणी करू. यापूर्वीची सरकार आणि मोदी साहेबांचं नऊ वर्षांचे भाजपा प्रणित सरकार यांच्यामधला फरकसुद्धा व्यापारी पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि तो समाजाला सांगितला पाहिजे, ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे.
बाळासाहेब माने म्हणाले की, मुद्रा कर्ज घेऊन अनेक तरुण उभे राहत आहेत. बँकिंग व अन्य क्षेत्रात पारदर्शकपणा आला आहे. पूर्वी करप्रणालीमुळे व्यापाऱ्याला भीती वाटत होती. पण आता पारदर्शकता, डिजिटल प्रणालीमुळे, तंत्रज्ञानामुळे व्यापाऱ्यांना अडचण नाही. यामुळे व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यापार करण्याकरता एक प्रोत्साहन मिळत आहे. आपली स्थानिक व्यापाऱ्यांची अडचण म्हणजे फेरीवाल्यांचा विषय. स्थानिक प्रश्न एका दिवसात सुटणार नाही, त्याकरता सातत्याने भारतीय जनता पार्टी, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी सहकारी बंधू-भगिनी यांनी सातत्याने संवादातून उपाययोजना, चर्चा, मार्ग काढला पाहिजे.
बाळासाहेबांनी जुन्या रत्नागिरीविषयी सांगताना सांगितले की, अनेक वर्षे रामआळीतून एसटी वाहतूक सुरू होती. मी शालेय जीवनापासून पाहत होतो. एसटी स्टॅंडवर उतरून पिशव्या हातात घेऊन शेकडो लोक रामआळीत खरेदी करत होते. गेली तीस वर्षे ती एसटी वाहतूक बंद आहे.
विमानतळ, रेल्वे, महामार्ग झाले पाहिजेत यातून वेळेची बचत होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी पाहिजे. त्यामुळे रत्नागिरीच्या मार्केटमध्ये रोलिंगला पैसा येईल. मत्स्य व्यवसाय किंवा आंबा हे दोन व्यवसाय सोडले तर चलनवलन होणार कसे. त्यामुळे अर्थचक्र थंडावले आहे. आपल्याला एक विनंती करतो की, अनेक कल्पक छोट्या छोट्या सूचना, उपाययोजना आपल्याकडून येऊ शकतात, आमच्याकडून येऊ शकतात. जेणेकरून रत्नागिरी शहराचा व्यापार वाढला पाहिजे. व्यापारी, उद्योजकांना सुविधा मिळत नाहीत. व्यापारी असल्यामुळे या सगळ्या समस्यांना तोंड द्यायला किंवा प्रतिकार करायला तुमच्याकडे वेळ नाही. माझी आपल्याला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने जरूर सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्या छोट्या मोठ्या समस्या असतील, एमआयडीसीसारख्या व्यवस्था किंवा प्रशासकीय कार्यालयामधला अनाकोंडी कारभार असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हा आमच्याकडे मांडा. भविष्यकाळामध्ये आपण सातत्याने एकत्र येऊया आणि ज्या ज्या काही व्यापाऱ्यांना म्हणून येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा जरूर प्रयत्न करू, असे श्री. माने यांनी सांगितले.












