शोधकार्य युद्धपातळीवर सुरू
सोशल मीडियावर वीडियो होतोय व्हायरल
चिपळूण (प्रतिनिधी): शहरातील गांधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून एका तरुण विवाहित दाम्पत्याने वाशिष्ठी नदीत उडी मारल्याचा धक्कादायक घटना बुधवारी (३० जुलै) दुपारी घडली. सदर घटनेमुळे चिपळूण परिसरात एकच खळबळ उडाली असून एनडीआरएफच्या जवानांकडून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी निलेश आहिरे (वय १९) व तिचा पती निलेश रामदास आहिरे (वय २६, सध्या रा. चिपळूण पाग, मूळ धुळे) अशी दोघांची नावे आहेत. बुधवारी दुपारी या दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गांधारेश्वर ब्रिजवरून एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तत्काळ एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) यांना पाचारण करण्यात आले असून त्यांचे जवान दोघांचा नदीत कसोशीने शोध घेत आहेत. गांधारेश्वर पुलावर या दांपत्याची दुचाकी आढळून आली आहे. या घटनेमुळे गांधारेश्वर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोधकार्यासाठी नदीकाठ सील केला. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.
दरम्यान, अश्विनी व निलेश यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, अशी माहिती समजते. दोघेही काही दिवसांपासून पाग येथे भाड्याने वास्तव्यास होते. या दोघांनी नदीत उडी मारण्याचे कारण समजू शकलेलेले नाही. या घटनेची माहिती संबंधित प्रशासन व महसूल विभागाला देण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. या दोघांचा सायंकाळी उशिरापर्यंत थांगपत्ता लागू शकलेला नाही.













