सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील चराठा आंतरराष्ट्रीय शाळेने एक नवा इतिहास घडवला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते चराठा आंतरराष्ट्रीय शाळा क्रमांक १ ला सर्वोत्कृष्ट पीएमश्री शाळा म्हणून राष्ट्रास समर्पित करण्यात आले. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, उपशिक्षक आणि स्वयंपाकी मदतनीस यांचा विशेष सत्कार करून त्यांचा गौरव केला.
चराठा आंतरराष्ट्रीय शाळेने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ‘पीएमश्री’ (PM Schools for Rising India) योजनेअंतर्गत देशातील निवडक शाळांना अद्ययावत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, आणि या योजनेत चराठा शाळेने अव्वल स्थान पटकावले आहे. हे सावंतवाडी तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
या सत्कार समारंभावेळी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव रो. सीताराम तेली, खजिनदार रो. आनंद रासम, तसेच रो. अनंत उसगावकर, रो. सुबोध शेलटकर, रो. सोमनाथ जिगजीनी, रो. प्रदीप शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेतील माजी मुख्याध्यापिका वर्षा देसाई, सध्याच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, शिक्षक आदिती चव्हाण, अमिषा कुंभार, धनदा शिंदे, विजय माधव, नागेश बांदेकर, प्रदीप कोटकर, दर्शना परब, आणि सावित्री कुबल यांच्यासह शाळेतील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी सत्कार करण्यात आला. चराठा आंतरराष्ट्रीय शाळेच्या या यशामुळे सावंतवाडीच्या शैक्षणिक परंपरेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे. या शाळेने केवळ तालुक्याचेच नव्हे, तर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे











