सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा क्रमांक १, चराठा हिला ‘पीएमश्री’ शाळा म्हणून समर्पित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमादरम्यान हा बहुमान शाळेला प्रदान करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते श्री. संदीप गावडे यांची विशेष उपस्थिती होती.
या सत्कार समारंभात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. “चराठा नं. १ शाळेला मिळालेला हा ‘पीएमश्री’ दर्जा केवळ शाळेचा नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव आहे,” असे ते म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांनुसार शाळेने केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळेच हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी युवा नेते श्री. संदीप गावडे, बांदा मंडल अध्यक्ष श्री. स्वागत नाटेकर, सौ. रेश्मा सावंत, बांदा शहर अध्यक्ष श्री. बाबा काणेकर, ॲड. सिद्धांत भांबुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘पीएमश्री’ (PM SHRI – PM Schools for Rising India) योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्या अंतर्गत देशातील निवडक शाळांना अद्ययावत शिक्षण सुविधा, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष सहाय्य दिले जाते. चराठा नं. १ शाळेला हा सन्मान मिळाल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. शाळेच्या या यशाने परिसरातील शैक्षणिक वातावरणाला एक नवी ऊर्जा मिळाली असून, इतर शाळांसाठीही हे एक प्रेरणास्थान बनले आहे.













