विद्यार्थ्यांना मिळणार गरमागरम पौष्टिक चपात्या
आंबोली । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पौष्टिक आहाराची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स-सर्व्हिसमेन असोसिएशन संचालित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या निवासी सैनिक शाळेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शाळेच्या आवारात अत्याधुनिक चपाती मेकिंग मशीन बसवण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आता जेवणात गरमागरम आणि सकस चपात्या उपलब्ध होणार आहेत.
गुजरातहून मागवण्यात आलेली ही अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीन ताशी एक हजार चपात्या बनवण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वेळेवर आणि ताज्या चपात्या देणे शक्य होणार आहे. या मशीनच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांच्या आहाराची गुणवत्ता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या अत्याधुनिक चपाती मेकिंग मशीनचे उद्घाटन नुकतेच शाळेत एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे कार्याध्यक्ष सुनील राऊळ, कॅप्टन दिनानाथ सावंत, संचालक जॉय डॉन्टस, शिवाजी परब, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ आणि प्राचार्य नितीन गावडे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल पालकांनी विशेष समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आहारासाठी उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या मशीनमुळे विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.












