फणस खाणारा कोल्हा

युथ बीट्स फॉर क्लायमेट सदस्यांना निसर्ग भ्रमंती करताना ‘दर्शन’

अमित खोत | मालवण : ‘युथ बीट्स फॉर क्लायमेट’ या संस्था सदस्यांना मालवण परिसरात निसर्ग भ्रमंती करत असताना वस्ती जवळच्या कोल्हा फणस खाताना दिसला. दर्शन वेंगुर्लेकर यांनी याचे चित्रीकरण केले आहे.

याबाबत माहिती देताना वेंगुर्लेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये मी आणि माझ्या युथ बीट्स फॉर क्लायमेट’ या संस्थेचे सदस्य निसर्ग भ्रमंती करत असताना वस्ती जवळच्या परिसरात आम्हाला कोल्हा फणस खाताना दिसला.
हे त्याचे वर्तन आमच्यासाठी दुर्मिळ होते. यापूर्वी अनेकदा आंबा, काजू, जांभुळ, बोर किवा करवंदे यासारखी सड्यावर मिळणारी फळे खाताना कोल्ह्याला आम्ही पाहिले होते.
ही फळे पिकल्यावर खाली पडतात त्यांना सहज खायला मिळतात. ती खाण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागत नाही. पण कवच असलेली फळे खाण्यासाठी मात्र जास्त मेहनत करावी लागते. आणि ती मेहेनत करणे त्यांना पसंत नसावे. त्यामुळेच असेल, कोल्हा फणस किंवा नारळ खाताना सहसा आढळलेला नसावा.

झाडावरुन पडलेली फळे खाणारा कोल्हा, झाडांवर किंवा वेलींवर चढून फळे खाण्यास उत्सुक नसतो. कदाचित त्यामुळेच ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ ही म्हण त्याला लागू झाली असावी असे वाटते.

मात्र फणस खाताना दिसलेला हा कोल्हा आमच्यासाठी दुर्मिळ असाच म्हणावा लागेल. असे दर्शन वेंगुर्लेकर यांनी म्हटले आहे.