युवा नेते संदीप गावडे यांचा राष्ट्रप्रेमाचा आगळावेगळा संकल्प
सावंतवाडी । प्रतिनिधी : देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती जनमानसात सदैव प्रज्वलित असणारी भावना अधिक तेजाने तळपत राहावी, या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात उंच असे दोन राष्ट्रध्वज सावंतवाडी तालुक्यात उभारले जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा अनोखा आणि प्रेरणादायी संकल्प सोडला असून, लवकरच आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे राष्ट्रध्वज सन्मानाने फडकावले जातील, अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत संदीप गावडे बोलत होते. यावेळी यांच्यासोबत सावंतवाडी भाजपा शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, उल्हास गावडे आदी उपस्थित होते.
श्री. गावडे यांनी आपल्या मनोगतातून या संकल्पामागील भावना स्पष्ट केली. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही देशहिताला समर्पित अशी संघटना आहे आणि या संघटनेत काम करताना नेहमीच समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा मिळते. याच प्रेरणेतून दरवर्षी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा आपण जपली आहे. गतवर्षी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील ११ शाळांना सोलर सिस्टीमद्वारे प्रकाशमान करण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षी जनतेच्या राष्ट्रप्रेमाला एक नवी दिशा देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे दोन ध्वज सावंतवाडी शहर आणि ग्रामीण भाग या दोन्ही ठिकाणी उभारले जाणार आहेत. शहरासाठी योग्य जागेची निवड करण्यासाठी पालिकेकडे मागणी करण्यात येणार असून, सावंतवाडी भाजपची टीम यावर चर्चा करून जागा निश्चित करणार आहे. तर ग्रामीण भागासाठी चौकुळ गावात योग्य जागा निवडली जाईल. चौकुळ येथे गावांतील ज्येष्ठ नागरिक, मानकरी आणि भाजप कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून जागा निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना श्री. गावडे यांनी या दोन ठिकाणांची निवड करण्यामागे एक विशेष कारण सांगितले. सावंतवाडी शहराला सैनिकी परंपरा लाभली आहे आणि त्याचप्रमाणे चौकुळ गावालाही सैनिकी वारसा आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्वात उंच राष्ट्रध्वज असतील, ज्यामुळे केवळ राष्ट्रभक्तीला प्रेरणाच मिळणार नाही, तर परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरात लवकर हे ध्वज उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.










