कीर्तनातून राष्ट्र आणि धर्म जागृती करा

ह.भ.प. पुनाळेकर यांचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिक विचारांसोबतच राष्ट्र आणि धर्म जागृती करण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे कीर्तनाचा सदुपयोग करून समाजाला जागृत करा, असे आवाहन भगवत भक्ती प्रबोधिनीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. पुनाळेकर यांनी केले.

गुरुवर्य कीर्तनभूषण श्रीराम झारापकर शिष्य परिवार यांच्या वतीने आकेरी येथील श्री. विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी श्री. विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालयाचे अध्यक्ष मिहिर झारापकर, कार्यवाह ह.भ.प. दिनकर प्रभू केळुसकर, ह.भ.प. शेखर पाडगावकर, श्री. धामापूरकर, गुरुदास केळुसकर, ह.भ.प. रामचंद्र मेस्त्री, सौ. ललिन तेली यांच्यासह अनेक कीर्तन तज्ञ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी देवता पूजन आणि श्री गुरु प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक मंगलाचरण सादर केले. या सोहळ्यात ह.भ.प. सुनील मयेकर, ह.भ.प. संदेश गोसावी, ह.भ.प. विक्रम मुणगेकर, सौ. पूर्वा गावडे, कु. वीणा परब आणि कु. दुर्वा सावंत यांनी सुश्राव्य कीर्तन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी, कीर्तन अलंकार पदवी प्राप्त केलेल्या ह.भ.प. सुनील मयेकर, ह.भ.प. संदेश गोसावी, ह.भ.प. विक्रम मुणगेकर, सौ. पूर्वा गावडे, कु. वीणा परब आणि कु. दुर्वा सावंत यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.