मुंबई: राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष एक महत्त्वाचा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात गेल्या सात महिन्यांमध्ये २,७३८ रुग्णांना तब्बल २५ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, आता ही प्रक्रिया पेपरलेस आणि डिजिटल झाली आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे रुग्णांना मंत्रालयात जाण्याची गरज राहिलेली नाही.
अशी आहे मदत मिळवण्याची प्रक्रिया:
रुग्णांनी सुरुवातीला महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांमधून उपचार करणे शक्य नसेल, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. या प्रक्रियेमुळे शासकीय योजनांचा योग्य वापर होतो आणि गरजू रुग्णांपर्यंत निधी पोहोचतो, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
या २० गंभीर आजारांसाठी मिळते मदत:
* कॉक्लियर इम्प्लांट (वय २ ते ६)
* हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे प्रत्यारोपण
* हिप रिप्लेसमेंट
* कर्करोग शस्त्रक्रिया
* रस्ते अपघात आणि लहान मुलांची शस्त्रक्रिया
* मेंदूचे आजार
* हृदयरोग
* डायलिसिस
* कर्करोगावरील केमोथेरपी आणि रेडिएशन
* अस्थिबंधन
* नवजात शिशुंचे आजार
* गुडघ्याचे प्रत्यारोपण
* भाजलेले रुग्ण (बर्न)
* विद्युत अपघात रुग्ण
आवश्यक कागदपत्रे:
* रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड
* तहसीलदार कार्यालयाचा १.६० लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला
* संबंधित आजाराचे वैद्यकीय अहवाल
* वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
* रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो
* रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असणे आवश्यक आहे
* अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर अहवाल
* अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC नोंदणी पावती
सर्व आवश्यक कागदपत्रे ‘[email protected]’ या ईमेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवावीत. अधिक माहितीसाठी, टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा.
कोकण विभागातील मदतीचा आढावा (१ जानेवारी ते ३० जुलै २०२५):
* ठाणे: १३३८ रुग्णांना १२ कोटी १० लाख १० हजार
* मुंबई शहर: ४२८ रुग्णांना ४ कोटी १ लाख १५ हजार
* मुंबई उपनगर: ३९२ रुग्णांना ३ कोटी ६१ लाख २९ हजार
* रायगड: २१९ रुग्णांना १ कोटी ९७ लाख ३ हजार
* रत्नागिरी: १६४ रुग्णांना १ कोटी ३० लाख ६० हजार
* पालघर: १५३ रुग्णांना १ कोटी २८ लाख ४१ हजार
* सिंधुदुर्ग: ४४ रुग्णांना ५७ लाख ७९ हजार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, हे कामकाज अधिक पारदर्शकपणे सुरू असून, गरजूंपर्यंत मदत वेळेत पोहोचत आहे. भविष्यातही जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मदत दिली जाईल, असे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.












