नागपूर–मडगाव विशेष रेल्वे पुन्हा सुरू; डब्यांची संख्या २२ वर

प्रवाशांना दिलासा; ३ एसी, ८ स्लीपर व १ जनरल डबा वाढविला

देवगड : प्रतिनिधी

प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, नागपूर जंक्शन ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणारी ०११३९ नागपूर–मडगाव विशेष रेल्वे सुधारित डब्यांच्या संरचनेसह पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने १६ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

या विशेष रेल्वेची पूर्वीची संरचना एकूण १९ डब्यांची होती. त्यामध्ये ३ थ्री टियर एसी, ८ स्लीपर, ६ जनरल आणि २ एसएलआर/डी डबे होते. आता सुधारित संरचनेनुसार रेल्वेला २ थ्री टियर एसी, ११ स्लीपर, ७ जनरल आणि २ एसएलआर/डी डबे असतील. त्यामुळे या रेल्वेची एकूण डब्यांची संख्या १९ वरून २२ झाली आहे.

सुधारित संरचनेनुसार एसी डब्यांची संख्या एकने कमी करण्यात आली असली, तरी स्लीपरचे ३, तर जनरलचे १ डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य आणि स्लीपर श्रेणीतील प्रवाशांना अतिरिक्त आसनक्षमता उपलब्ध होणार आहे.

०११३९ नागपूर–मडगाव विशेष रेल्वेची सेवा १६ सप्टेंबर २०२६ (बुधवार) पासून सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेचे मार्गातील थांबे व वेळापत्रकाची सविस्तर माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत थांबे आणि वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.