खेड (प्रतिनिधी ) – मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर वसुली, दमदाटी आणि महिलांवरील छळाविरोधात खेड शहरातील शेकडो महिलांनी एकत्र येत खेड पोलीस ठाण्यावर जोरदार एल्गार केला. महिलांनी थेट पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांची भेट घेऊन कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी नोंदवल्या.
महिलांच्या म्हणण्यानुसार, फायनान्स कंपन्यांचे एजंट रात्री अपरात्री घरी येऊन धमक्या देतात, अपमानास्पद भाषा वापरतात आणि मानसिक छळ करतात. याप्रकरणी महिलांनी पोलिसांना लेखी निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली.

पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित फायनान्स कंपन्यांना चौकशीसाठी बोलावले असून, अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाला खेड तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष राबिया जसनाईक यांनी सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “महिलांच्या शोषणाविरोधात लढा आता उच्च पातळीवर नेला जाईल,” अशी ठाम भूमिका मांडली.











