Breaking : फुरूसमध्ये घरफोडी करणारा चोर रंगेहात जेरबंद; मात्र खेड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

२८ ऑगस्टला खवटीत पकडून दिलेला चोर ८ सप्टेंबरला फुरूसमध्ये पुन्हा चोरी करताना सापडला

खेड (प्रतिनिधी) -: खेड तालुक्यातील फुरूस परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या सत्राला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री फुरूस येथील जागरूक तरुणांनी एका बंद घरात शिरलेल्या चोराला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अनुज रमेश कावणकर असे या संशयित चोराचे नाव आहे. या कारवाईमुळे फुरूस परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला असला तरी, याच चोराला काही दिवसांपूर्वी खवटी गावातील ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असतानाही तो पुन्हा चोरी करण्यासाठी मोकाट कसा सुटला, यावरून आता खेड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फुरूस गावात गेल्या आठवडाभरापासून सायंकाळनंतर बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी करण्याचे प्रकार सुरू होते. चोरीच्या एका घटनेत संशयित सीसीटीव्हीत कैद होऊनही पोलिसांना त्याचा शोध लागत नव्हता. दरम्यान, मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका बंद घरात अचानक दिवा लागल्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणाच्या निदर्शनास आले. घरातील व्यक्ती बाहेरगावी असताना प्रकाश दिसल्याने त्याने कोणताही धोका न पत्करता तातडीने गावातील इतर १५-२० तरुणांना घटनास्थळी बोलावून घेतले. या तरुणांनी घराला गराडा घातला. संशयित अनुज कावणकर घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच तरुणांनी त्याला धाडसाने पकडले आणि खेड पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसी कारवाईबद्दल फुरूसच्या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, या चोराला खेड पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले होते. २८ ऑगस्ट २०२६ रोजी याच संशयित इसमाने खवटी सतीचा कोंड येथील लक्ष्मण पिसाळ यांचे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता. खवटी गावातील सतर्क ग्रामस्थ नितीन दळवी, मंगेश शेलार, मनोहर शेलार, गणेश जंगम आणि अनंत दळवी यांच्या साथीने पोलीस पाटील अमोल दळवी व पोलीस पाटील मनोहर दळवी यांनी या चोराला पकडून खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले होते. फुरूसमध्ये चोराला पकडल्याची बातमी ‘दैनिक प्रहार’मध्ये प्रसिद्ध होताच, खवटीचे पोलीस पाटील मनोहर दळवी यांनी प्रतिनिधीशी संपर्क साधून २८ ऑगस्टच्या घटनेची माहिती उघड केली.
एकदा रंगेहात आणि पुराव्यांसहित पोलिसांच्या ताब्यात दिलेला चोर अवघ्या काही दिवसांत पुन्हा बाहेर येऊन खेड तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोडी करण्याचे धाडस कसे करतो, असा संतप्त सवाल आता तालुक्यातून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच ग्रामीण भागात चोरीचे सत्र वाढले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सध्या पोलिसांनी संशयित अनुज कावणकर याला पुन्हा ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिस तपासात हा संशयित गेल्या चार-पाच दिवसांपासून तांबड परिसरातील जंगलात लपून बसला असल्याची माहिती समोर आली आहे. फुरूसमधील घरातून त्याने नेमकी कोणती मालमत्ता चोरली आणि यापूर्वीच्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा किती सहभाग आहे, याचा सविस्तर तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.