जिल्हाधिकाऱ्यांसह , प्रांत, तहसीलदार यांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या वतीने वाडी वस्तीलगत,जोर जबरदस्तीने लादण्यात आलेला घनकचरा प्रकल्प( डम्पिंग ग्राउंड) रद्द होण्यासाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने १४ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत लांजा तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे वस्तीलगत डंपिंग ग्राउंड प्रकल्प नियोजित आहे. सदर प्रकल्पासाठी घेतलेला प्रस्ताव हाच मुळात चुकीचा आणि शासकीय नियमांची पायमल्ली करून घेतलेला असून त्यामध्ये गैरव्यवहार करून हा प्रकल्प ग्रामस्थांवर लादणार असल्याने आमच्या ग्रामस्थांच्या आरोग्याला तो हानिकारक आहे .त्याचप्रमाणे तो लोक वस्तीजवळ असल्याने पाणी दूषित होऊन प्रदूषण व रोगराई होऊन आमचे जीवन उध्वस्त होणार आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्हा निवड समितीने सन २०२१ मध्ये कोत्रेवाडी येथील नियोजित जागेची पाहणी करून सदरची जागा ही घनकचरा प्रकल्प नियम २०१६ च्या निकषात बसत नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनी मुख्याधिकारी लांजा यांना पत्र दिलेले आहे .त्या अनुषंगाने मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांनी देखील सदर जागा रद्द असल्याबाबत दिनांक २२ मार्च २०२१ रोजी ग्रामस्थांना पत्र दिलेले आहे .
वास्तविक पाहता ही जागा अयोग्य असल्यामुळे लांजा नगरपंचायतीने अन्य ठिकाणी जागा घेणे आवश्यक होते. परंतु ही जागा एका धनाड्य व्यक्तीची असल्यामुळेच एका जागेवर लक्ष केंद्रित करून नगरपंचायत त्याच जागेवर अडून बसली आहे .यातच गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे .सदर जागेला जाण्या येण्यासाठी कोणताही शासनाचा अधिकृत पोहोच रस्ता नाही. असे असताना देखील लांजा नगरपंचायतीने भूमी अभिलेख कार्यालय लांजा यांच्याकडून सदर नियोजित, पूर्ण जागेची मोजणी प्रक्रिया व हद्दीखुणा निश्चित न करता लोकसभेच्या आंचार संहितेच्या काळात घाई गडबडीने भ्रष्टाचार करण्यात हेतूने त्या जागेचे खरेदीखत केलेले आहे .या विरोधात अनेक वेळा दाद मागण्यात आलेली आहे .
या विषया संदर्भात ८ जुलै २०२५ रोजी उपोषण करण्यात आले होते. परंतु प्रशासनामार्फत कोणतेही सक्षम अधिकारी ग्रामस्थांच्या तक्रारीची साधी विचारपूस करण्यासाठी देखील उपोषणस्थळी आलेले नाहीत. या प्रशासनाच्या निद्रावस्थेला जागे करण्यासाठीच लोकशाही मार्गाने १४ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन पुढे म्हटले आहे की प्रशासनाच्या या दुर्लक्षित वृत्तीमुळेच आम्हाला देशाच्या पवित्र अशा स्वातंत्र्यदिनी न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसणे हे गैर वाटत आहे. हे केवळ आपल्या अधिकाऱ्यांच्या गैर कारभार वृत्तीमुळेच आम्हाला नाईलाजाने उपोषण करणे भाग पडत आहे . खरे तर ग्रामस्थांच्या तक्रारीकडे सतत दुर्लक्ष करून उपोषण करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवावी व वस्ती जवळचा प्रस्ताविक घनकचरा प्रकल्प स्थलांतरित करण्यात यावा. तसेच गैर कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,
लांजा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपंचायत यांना सादर केलेल्या आहेत.










